हृषिकेश गांगुले राज्यात पहिला, रुचा पावशे दुसरी
बंगळूर : “नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने बुधवारी रात्री उशिरा नीट-२०२२ चा निकाल जाहीर केला. कर्नाटकातील तीन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गुणवत्ता यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे.
हृषिकेश नागभूषण गांगुले कर्नाटकचा टॉपर आणि अखील भारतीय गुणवत्ता यादीत तिसरा टॉपर आहे. जुलैमध्ये बीएनवायएस (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सेस) आणि बीव्हीएससी (बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्सेस) स्ट्रीममध्ये जाहीर झालेल्या सीईटी निकालातही तो टॉपर होता.
त्यांच्या खालोखाल, रुचा पावशे ही अखील भारतीय यादीत चौथी आणि राज्यात दुसरी टॉपर आहे. महिला वर्गात ती देशात दुसरी टॉपर देखील आहे. कृष्णा एस. आर. हा राज्यातील तिसरा टॉपर आणि अखील भारतीय यादीत आठवा टॉपर आहे. अखील भारतीय गुणवत्ता यादीत कर्नाटकातील नऊ विद्यार्थ्यांना पहिल्या ५० मध्ये स्थान मिळाले आहे.
७२,२६२ विद्यार्थी पात्र
यावर्षी कर्नाटकातील एकूण एक लाख ३३ हजार २५५ विद्यार्थ्यांनी नीट- २०२२ साठी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख २२ हजार ४२३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी एकूण ७२ हजार २६२ विद्यार्थी वैद्यकीय जागांसाठी पात्र ठरले आहेत.
नीट- २०२२ परीक्षा १७ जुलै रोजी भारताबाहेरील १४ शहरांसह देशभरातील ४९७ शहरांमध्ये असलेल्या ३,५७० विविध केंद्रांवर घेण्यात आली. यावर्षी संपूर्ण भारतातून एकूण १८ लाख ७२ हजार ३४३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि १७ लाख ६४ हजार ५७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी नऊ लाख ९३ हजार ०६९ विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta