बंगळुरू (संतोषकुमार कामत) : रुग्णासाठी डॉक्टर देव असतात. डॉक्टर रुग्णांसाठी सदैव झटतात, रात्रीचा दिवस करतात. रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका डॉक्टरांनी पळत पळत रुग्णालय गाठलं. गोविंद नंदकुमार असं या डॉक्टराचं नाव आहे. ३० ऑगस्टला नंदकुमार मणिपाल रुग्णालयात जात होते. त्यावेळी रस्त्यात मोठी वाहतूककोंडी होती. वाहतूककोंडी फुटण्याची वाट पाहत राहिल्यास शस्त्रक्रियेला उशीर होणार याची त्यांना कल्पना आली. त्यामुळे त्यांनी धावत धावत रुग्णालय गाठण्याचं ठरवलं आणि ते पळत सुटले.
एका रुग्णाच्या पित्ताशयाच्या पिशवीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी नंदकुमार मणिपाल रुग्णालयात जात होते. सरजापूर-मराठाहल्ली परिसरात ते वाहतूककोंडीत अडकले. शस्त्रक्रियेची वेळ जवळ आल्यानं आणि वाहतूककोंडी फुटण्याची शक्यता दिसत नसल्यानं त्यांनी कार तिथेच ठेवून धावण्यास सुरुवात केली. कारमधून बाहेर पडून त्यांनी ३ किलोमीटरवर असणारं रुग्णालय गाठलं. त्यासाठी त्यांना ४५ मिनिटं लागली.
मला कनिंघम रस्त्यावरून सरजापूरमधील मणिपाल रुग्णालय गाठायचं होतं. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं काही किलोमीटर परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. वाहतूक सुरळीत होण्याचे कोणतेही संकेत मिळत नसल्यानं मी कारमधून बाहेर पडलो आणि जवळपास ४५ मिनिटं धावून रुग्णालयात पोहोचलो, असं नंदकुमार यांनी सांगितलं. वाहतूककोंडी फुटेपर्यंत वाट पाहणं मला शक्य नव्हतं. कारण माझ्या रुग्णांना शस्त्रक्रिया होईपर्यंत काहीही खाता येत नाही. त्यामुळे मी त्यांना जास्त वेळ प्रतीक्षा करत ठेऊ शकत नव्हतो, असंही ते पुढे म्हणाले.
डॉ. गोविंद नंदकुमार गेल्या १८ वर्षांपासून मणिपाल रुग्णालयात गैस्ट्रोएंटरोलॉजी सर्जन म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत १ हजारहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. पचनसंस्थेशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात नंदकुमार अतिशय निपुण आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta