Monday , December 8 2025
Breaking News

उमेश कत्तींसह दिवंगत सदस्याना विधानसभेची श्रध्दांजली

Spread the love

बंगळूर : विधानसभेच्या अधिवेशनाला सोमवारी (ता. 12) सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हृदयविकाराने निधन झालेल्या अन्न व वनमंत्री उमेश कत्ती यांना श्रध्दांजली वाहून अधिवेशनाचे कामकाज आज तहकूब करण्यात आले.
सकाळी अकरा वाजता कामकाज सुरू होताच दिवंगत लोकप्रतिनिधीना श्रध्दांजली वाहन्याचा सभागृहात प्रस्ताव सादर करण्यात आला. अन्न व वनमंत्री उमेश कत्ती आणि बागेपल्ली मतदारसंघाचे माजी आमदार जी. व्ही. श्रीराम रेड्डी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सभागृहात उपस्थित होते. उमेश कत्ती यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई कांहीसे भावूक झाले.
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी श्रध्दांजलीच्या प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला. ते म्हणाले, उमेश कत्ती माझे चांगले मित्र होते. मी जे. एच. पटेल यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असताना ते मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांच्याकडे फलोत्पादन आणि बंदराची जबाबदारी देण्यात आली होती. त्या खात्यांवर ते समाधानी नव्हते. याबाबत त्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. त्यावर उमेश कत्तीना जे. एच. पटेल यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग दिला. तेव्हा मी अर्थमंत्री होतो. त्यावेळी उमेश कत्ती नेहमी भेटायला यायचे, अशी आठवण सिद्धरामय्या यांनी सांगितली.
सिद्धरामय्या यांनी उमेश कत्तीसोबतच्या मैत्रीची आठवणही सांगितली, ‘गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी प्रचारासाठी बेळगावला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी भोजनासाठी घरी येण्याचा आग्रह धरला, तेंव्हा ते वेगळ्या पक्षात होते. ते बेळगावातील आघाडीचे नेते होते. त्यांना सहकार क्षेत्रातील प्रचंड ज्ञान होते. त्या क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग होता. उमेश कत्तीना विविध विषयांचे चांगले ज्ञान होते. त्यामुळे त्यांच्याकडे विविध विभागांची जबाबदारी देण्यात आली ती त्यांनी कुशलतेने हाताळली.
स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मागणी त्यांनी लाऊन धरल्याचा उल्लेख करून वेगळ्या राज्याबद्दल न बोलण्याचा त्यांना सल्ला दिल्याचे सिद्धरामय्या म्हणाले.
कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जे. सी. मधुस्वामी यांनीही कत्ती यांना श्रध्दांजली वाहून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
काँग्रेसचे सदस्य आर. व्ही. देशपांडे श्रध्दांजलीच्या प्रस्तावावर बोलताना म्हणाले, १९८५ च्या पोटनिवडणुकीतील प्रचाराची आठवण झाली. उमेश कत्ती यांचा मृत्यू झाला तेव्हा मी सागरमध्ये होतो. त्यामुळे मी बेळगावला जाऊ शकलो नाही. ते म्हणाले की, त्यांचे बंधू रमेश कत्ती यांच्याशी मी बोललो आणि शोक व्यक्त केला. शोक प्रस्तावावर धजदचे आमदार सी. एस. पुट्टाराजू यांनीही बोलून कत्तींसह दिवंगत सदस्यांना श्रध्दांजली वाहिली.

About Belgaum Varta

Check Also

नवहिंद सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी सायनेकर तर व्हा. चेअरमनपदी अनिल हुंदरे यांची निवड

Spread the love  येळ्ळूर : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *