मुख्यमंत्री बोम्मई, कल्याण कर्नाटकचा अमृत महोत्सव उत्साहात
बंगळूर : सध्याचा बिदर-बळ्ळारी रस्ता चौपदरी द्रुतगती महामार्ग म्हणून विकसित करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली.
शनिवारी येथे कल्याण कर्नाटकच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर ते म्हणाले की, प्रस्तावित एक्सप्रेस हायवे कल्याण कर्नाटक प्रदेशातील रस्ते संपर्क सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. रायचूर आणि बळ्ळारी येथे विमानतळ बांधण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या सहाय्याने यादगीर, रायचूर आणि गुलबर्गा या भागात रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला आहे.
बोम्मई म्हणाले की, या भागात उद्योग उभारण्यासाठी अधिक प्रोत्साहन दिले जात आहे. केंद्र सरकारने कलबुर्गी येथे टेक्सटाईल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असून रायचूर आणि विजयपुरा येथे टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे सुमारे २५ हजार नोकऱ्या निर्माण होतील आणि ही योजना लवकरच सुरू होईल. याशिवाय बळ्ळारीमध्ये जीन्स पार्क आणि यादगीरमध्ये फार्मास्युटिकल क्लस्टरची स्थापना करण्यात आली आहे. आधीच कोप्पळमध्ये टॉय क्लस्टरचे बांधकाम सुरू झाले आहे. पेट्रोलियम उत्पादनांवर आधारित सीपेट केंद्र सरकारच्या सहाय्याने ९० कोटी रुपये खर्चून बिदरमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या विकासासाठी विद्यमान सरकार कटिबद्ध आहे.
या भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर राजकारण्यांनी राजकारण विसरून काम केले पाहिजे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे. राजकीय हस्तक्षेप हा या भागावर मोठा अन्याय करण्यासारखा आहे. भाजप सरकारने १०० कोटी रुपये दिले असून गुलबर्गा शहराला वायफाय कनेक्ट, केबल कनेक्ट आणि इतर अत्याधुनिक सुविधा देऊन आंतरराष्ट्रीय शहरासारखे बनवण्याचा संकल्प केला आहे. ज्या वेळी संपूर्ण कर्नाटक प्रगती करत आहे, अशा वेळी ऐतिहासिकदृष्ट्या मागासलेल्या कल्याण कर्नाटकाचाही उर्वरित राज्याप्रमाणेच विकास झाला पाहिजे. कल्याण कर्नाटकच्या माध्यमातून नव कर्नाटक आणि नवभारताचा विकास झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
कल्याण कर्नाटकसाठी 5000 कोटी
कल्याण कर्नाटकच्या विकासासाठी आगामी अर्थसंकल्पात ५ हजार कोटी रुपयाची तरतूद करणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. गेल्या अर्थसंकल्पात कल्याण कर्नाटकच्या विकासासाठी तीन हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. कल्याणकारी राज्य होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून या भागाच्या शैक्षणिक विकासासाठी २१०० शाळा खोल्या उघडण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण कर्नाटक भागात २,५०० अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यात येतील, असे ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta