इच्छुकांचे नाराजीचे संकेत, मुख्यमंत्री बोम्मई यांची कसरत
बंगळूर : विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने सत्ताधारी भाजप आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी सज्ज झाला आहे. मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या नेत्यांमधील अस्वस्थता दूर करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कसरत सुरू केली असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.
गेल्या वर्षभराहून अधिक काळ मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत पक्षाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री बोम्मई यांनी याबाबत सकारात्मक प्रतिक्रीया दिल्याने सरकारच्या कार्यकाळाच्या अखेरीस त्यांना संधी मिळेल अशी आशा इच्छुकाना आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे. विस्ताराबाबत बोम्मई यांचे वक्तव्य प्रदीर्घ काळानंतर आले आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष मंत्रिमंडळ विस्ताराचा गांभिर्याने विचार करीत असल्याचे भाजपच्या सूत्रांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळात पाच पदे रिक्त असून इच्छुकांची यादी मोठी आहे.
एका कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतर राजीनामा द्यावा लागलेले माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी आपण मंत्री होण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. पाय दुखत असल्याने डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे आपण कामकाजात सहभागी झालो नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे आमदार एच. विश्वनाथ यांनी सत्ताधारी भाजपला इशारा दिला आहे की, भाजपला सत्ता मिळण्यासाठी मदत करणाऱ्या १७ आमदारांपैकी अनेकांना दिलेले वचन पाळण्याकडे पक्षाने डोळेझाक केली आहे. ही चूक पक्षाने ताबडतोब दुरूस्त करण्याची त्यांनी मागणी केली. आताच नेते शांत झाले नाहीत, तर त्याचे थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होतील, हे भाजपला चांगलेच ठाऊक आहे, असे ते म्हणाले.
भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदार आर. शंकर यांनी मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत भाजपने दिलेला शब्द पाळला नसल्याचे सांगितले.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपमध्ये पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रदेश भाजपमधील मंत्रिपदाच्या इच्छुकांमध्ये मंत्री होण्याचे स्वप्न पुन्हा उफाळून आले आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा हायकमांडसमोर प्रस्ताव ठेवला असल्याचे समजते.
यामुळेच बोम्मई यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करत योग्य वेळी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे सांगितले. आता अवघे काही महिने बाकी आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मंत्रिपदाच्या इच्छुकांना मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही, या चिंतेने मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिल्याने भाजपच्या गोटात पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत.
मंत्रिपदाच्या इच्छुकांनी पडद्यामागे लॉबिंग सुरू केले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिरंगाईवरून भाजपमध्ये तीव्र नाराजी आहे. यामुळे आमदारही नाराज झाले असून, या आमदारांच्या असंतोषावर बोम्मई कशी मलमपट्टी लावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.