Saturday , October 19 2024
Breaking News

विश्वविख्यात दसरा महोत्सवाला आज राष्ट्रपतींच्या हस्ते चालना

Spread the love

तयारी पूर्ण, दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

बंगळूर : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून साधेपणाने साजरा होणारा जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा यावेळी मोठ्या थाटात साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली असून दसरा उत्सवासाठी सांस्कृतिक नगरी म्हैसूर सजली आहे. उद्या (ता. २६) पासून दहा दिवसीय म्हैसूर दसरा साजरा होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हैसूरमधील चामुंडी टेकडीवर नाडहब दसऱ्याचे उद्घाटन करतील.
चामुंडी हील येथे आज सकाळी ९.४५ ते १०.५ या वेळेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते वृश्चिक लग्नात चांदीच्या रथात विराजमान होणार्‍या नदीदेवी चामुंडेश्वरी उत्सव मूर्तीला पुष्प अर्पण करून पूजन करतील. १० दिवस चालणाऱ्या जगप्रसिद्ध दसरा महोत्सवाचा शुभारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
उद्या होणाऱ्या दसरा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रपतींसोबतच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री, म्हैसूरच्या राजघराण्याचे वंशज, राज्याचे अनेक मंत्री, आमदार आणि खासदार सहभागी होणार आहेत.
यावेळी दसरा भव्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. सांस्कृतिक नगरी म्हैसूर दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोषणाईने उजळून निघणार आहे.
म्हैसूर दसरा महोत्सवाची सांगता पाच ऑक्टोबरच्या जंबो सवारीने होणार आहे. त्या दिवशी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई अंजनेयस्वामी मंदिराजवळ नंदीध्वजाची पूजा करतील आणि दुपारी २.३६ ते २.५० दरम्यान जंबूसावरी मिरवणूक सुरू होईल. संध्याकाळी सातच्या दरम्यान देवी चामुंडेश्वरी गजराज अभिमन्यूच्या सुवर्ण अंबरीमध्ये विराजमान होईल. मुख्यमंत्री बोम्मई चामुंडेश्वरीच्या मूर्तीला फुले अर्पण करून जंबूसवारीला चालना देतील.
दहा दिवस चालणाऱ्या दसरा उत्सवादरम्यान म्हैसूरमध्ये दररोज सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, युवा दसरा, वस्तूंचे प्रदर्शन दसऱ्याचे आकर्षण कायम ठेवणार असून, म्हैसूर भव्य उत्सवासाठी सज्ज झाले आहे.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना एस. टी. सोमशेखर म्हणाले की, उद्याच्या दसऱ्याच्या उद्घाटनाची तयारी पूर्ण झाली आहे. चामुंडी टेकडीवर दसरा उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एक हजार लोकांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रपतींसोबतच मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासह १४ मान्यवर व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. ते म्हणाले की, इतर मान्यवरांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली असून राष्ट्रपतींसोबत फोटो सेशनचे आयोजन करण्यात आले आहे.
कडक सुरक्षा
दसऱ्याच्या निमित्ताने म्हैसूरमध्ये उद्यापासून पाच ऑक्टोबरपर्यंत कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक खबरदारी घेण्यात आली आहे. दसऱ्यानिमित्त वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे, दसरा बंदोबस्तासाठी ५,४८५ पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे, म्हैसूरमध्ये सर्वत्र १३,१४० सीसी कॅमेरे लावण्यात आले आहेत आणि २४ तास सीसी कॅमेऱ्यात सर्व गोष्टी रेकॉर्ड करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दसऱ्याचे महत्त्वाचे कार्यक्रम ज्या ठिकाणी होतात त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. म्हैसूरचे जिल्हाधिकारी म्हणाले की, म्हैसूर पॅलेस, बन्निमंतपा, दसरा अंबरी मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले असून १२ अग्निशमन दल आणि आठ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पाच एकर जमीन कर्नाटक सरकारला परत करण्याचा मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा निर्णय!

Spread the love  बेंगळुरू : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबीयांच्या सिद्धार्थ विहार ट्रस्टला देण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *