Tuesday , March 3 2026
Breaking News

एनआयएचे पीएफआयवर पुन्हा छापे

Spread the love

 

मंगळूर, म्हैसूर, हुबळीसह विविध ठिकाणी कारवाई

बंगळूर : राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी मंगळूर, म्हैसूर, हुबळीसह राज्यातील अनेक भागांत बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) नेत्यांच्या घरांवर पुन्हा छापे टाकले आहेत.
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उप्पिनगडी, सुल्या, म्हैसूर, हुबळी यासह राज्यातील अनेक ठिकाणी पीएफआय नेत्यांच्या घरांवर छापे टाकून कागदपत्रे तपासण्यात आली. तसेच छापेमारीदरम्यान काही पीएफआय नेत्यांची चौकशी करण्यात आली असून काही पीएफआय नेत्यांची फरार झाल्याची माहिती समोर आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुलेमान अटक
म्हैसूरमधील एनआयए अधिकाऱ्यांनी पीएफआयचे माजी सचिव सुलेमान यांना अटक करून मंडी मोहल्ला येथील त्यांच्या घरावर छापा घातला. सुलेमानला पहाटे अटक करून एएनआयचे अधिकारी अज्ञात ठिकाणी नेऊन त्याची चौकशी करत आहेत व माहिती गोळा करत आहेत. हुबळी शहरात पहाटेच्या सुमारास एस.डी.पी.आय. नेत्याच्या घरावर एनआयएने छापा घातला.
जुनी हुबळी येथील नूरानी प्लॉट येथील एस.डी.पी.आय. नेते इस्माईल नालाबंद यांच्या घरावर छापा घालण्यात आला.
आज पहाटे चार वाजता छापा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. कसाबापेठ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नालाबंदच्या कार्यालयावरही छापा टाकून माहिती गोळा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
एनआयएने सुल्याच्या उप्पिनगडी येथे कारवाई केली, ज्यात बेल्लारे गावचे पंचायत सदस्य इक्बाल बेल्लारे, एसडीपीआयचे राज्य सचिव शफी बेल्लारे, सुल्याचे इब्राहिम शाह, जे भाजपचे युवा नेते प्रवीण नेतारू यांच्या हत्येप्रकरणी फरार होते, त्यांना अटक करण्यात आली आहे.

माहिती देणाऱ्यांना बक्षिस
पुत्तूर, बेल्लारे आणि सुल्या येथे एनआयए अधिकाऱ्यांच्या एकूण सहा पथकांनी शोध घेतला आणि लोकांकडून माहिती गोळा केली. अधिकाऱ्यांनी या चारही आरोपींची माहिती देणाऱ्यांना १४ लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. दोन आरोपींच्या माहितीसाठी पाच लाख रुपये आणि अन्य दोन आरोपींच्या माहितीसाठी दोन लाखाचे रोख बक्षीस देण्याची जाहीर घोषणा एनआयएने केली आहे.
मोहम्मद मुस्तफा आणि तुफैल यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी पाच लाख रुपये, उमर फारूक आणि अबुबकर सिद्दिकी या इतर दोन आरोपींची माहिती देणाऱ्यांना दोन लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊ, असे एनआयएने एका प्रकाशनात म्हटले आहे.
केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित संस्था किंवा उपकंपन्यांवर पाच वर्षांच्या कालावधीसाठी तात्काळ प्रभावाने बंदी घालण्याचा आदेश जारी केला. बंदीच्या संदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येचा उल्लेख करण्यात आला होता. पीएफआय बंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आपल्या अधिसूचनेत कर्नाटक सरकारच्या शिफारशीचा उल्लेख केला होता.

जुनी प्रकरणे
संजीत (केरळ २०२१), व्ही. रामलिंगम (तामिळनाडू २०१९), नंदू (केरळ २०२१), अभिमन्यू (केरळ २०१८), बिबिन (केरळ २०१७), शरथ (कर्नाटक २०१७), आर. रुद्रेश (कर्नाटक २०१६), प्रवीण पुजारी (कर्नाटक २०१६), शशी कुमार (तामिळनाडू २०१६) आणि प्रवीण नेत्तारू (कर्नाटक २०२२) यांच्या हत्येसह अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये पीएफआयचा सहभाग आहे. सार्वजनिक शांतता भंग करण्याचा आणि भीती निर्माण करण्याचा पीएफआयचा हेतू असल्याचे केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे.
………………………
देसाई

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *