सिध्दरामय्यांचा आरोप, महाजन अहवालाचे तुणतुणे
बंगळूर : बेळगावसह सीमा भाग सामान्य स्थितीत परत येत असतानाच, माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाने हा वाद विकोपाला नेला असल्याचा आरोप केला व आश्चर्य व्यक्त केले.
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात भाजपची सत्ता आहे. या दोन्ही राज्यातील सरकारने परस्पर चर्चा करून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केली असण्याची शक्यता आहे, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.
महाजन आयोगाच्या अहवालाने दोन्ही राज्यांमधील सीमाप्रश्न आधीच सुटला आहे. असे मत व्यक्त करून राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्र हे प्रकरण जिवंत ठेवत असल्याचा त्यांनी अजब शोध लावला. कर्नाटकातील मराठी जनतेवर होत असलेले अत्याचार व गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील वहानांचे कर्नाटकातील कन्नडीगांनी केलेले नुकसान याकडे दुर्लक्ष करून, महाराष्ट्रात दगडफेक आणि कर्नाटक बसेसचे नुकसान झाल्याचा त्यांनी कांगावा केला. सिद्धरामय्या म्हणाले, की मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पंतप्रधानाशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे.
वाद वाढू देणे आणि राजकीय फायद्यासाठी वापर करणे हे भाजपचे धोरण आहे. चर्चेने प्रकरण मिटवण्याऐवजी ते चिघळू देत बसले आहेत. दोन्ही राज्यांमधील वाहतूक ठप्प झाल्याने लोकांचे हाल होत आहेत. राज्य सरकारने परिस्थिती निवळण्यास मदत करावी, असे त्यांनी आवाहन केले.
सिद्धरामय्या यांनी बोम्मई यांना महाराष्ट्रातील कन्नडीगाना संरक्षण देण्याची विनंती केली व तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना त्रास दिल्याचा जावई शोध लावला.
पाणी आणि राज्याच्या सीमा हिताशी कोणतीही तडजोड करता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील सध्याच्या प्रशासनाने बेळगावची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मी मुख्यमंत्री असतानाही महाराष्ट्राने असेच आवाहन केले होते, पण खटला टिकत नाही असा आमचा युक्तिवाद होता. सध्याच्या कर्नाटक सरकारनेही हा खटला जोरदारपणे लढवावा, असे सिद्धरामय्या म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta