बंगळूर : दुसर्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार दि. 26 किंवा 27 तारखेला होण्याची शक्यता आहे. राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आल्यानंतरदेखील नूतन मंत्र्यांच्या खातेवाटपाला विलंब होत आहे. दुसर्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरच मंत्र्यांना खातेवाटप करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे तीन दिवसीय अधिवेशन संपवून 24 मेनंतर दिल्लीला रवाना होणार आहेत. या ठिकाणी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून दुसर्या टप्प्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त निश्चित करणार आहेत.
दुसर्या टप्प्यामध्ये 20 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यानंतरच सर्व मंत्र्यांना खातेवाटप केले जाणार आहे. पक्षात कोणतेही मतभेद व वाद होऊ नयेत, यासाठी खातेवाटपाला विलंब केला जात आहे. पहिल्या व दुसर्या टप्प्यातील मंत्र्यांना एकाचवेळी खाते वाटप केले जाणार आहे.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, कोणाची वर्णी लागणार?
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या नेतृत्वात सरकारमधील उर्वरित 24 मंत्रिपदांसाठी 80 हून अधिक इच्छुक आमदारांनी लॉबिंग सुरू केले आहे. इच्छुकांकडून रोज मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठींवर जोर दिला आहे. सर्व इच्छुक आमदार आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री निवडीनंतर आता मंत्रिपद निवड पक्षाला डोकेदुखीचे कारण बनले आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक व संभाव्य आमदार हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्या गटातील आमदार आहेत.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गटातील इच्छुक आमदार : एच. सी. महादेवाप्पा, बसवराज रायरेड्डी, दिनेश गुंडूराव, ई. तुकाराम, रहीमखान, एस. एस. मल्लिकार्जुन, के. एम. शिवलिंगेगौडा, ईश्वर खंड्रे, अजय सिंग, कृष्ण भैरेगौडा, विनय कुलकर्णी, यू. टी. खादर, संतोष लाड, विजयानंद काशप्पनवर, के. एन. राजण्णा, शामनुरू शिवशंकरप्पा, एम. कृष्णप्पा, शिवराम तंगडगी, श्रीनिवास माने, रिजवान अर्षद, एस. वाय. मेटी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या गटातील इच्छुक आमदार : लक्ष्मी हेब्बाळकर, तन्वीर सेठ, मधू बंगारप्पा, कुणीगल रंगनाथ, सलीम अहमद, एन. ए. हॅरीस, पोनण्णा. तसेच आ. लक्ष्मण सवदी, बी. के. हरीप्रसाद, जगदीश शेट्टर, प्रकाश हुक्केरीसुद्धा मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत.
दोन ते तीन दिवसांत मंत्र्यांचा शपथविधी : शिवकुमार
संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येणार असून, आणखी दोन ते तीन दिवसांनंतर नूतन मंत्री शपथ घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. येथे पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले, 26 मे राजी जुन्या सरकारचा कालावधी संपणार आहे. त्यानंतर नूतन मंत्रिमंडळाची रचना होणार आहे. आणखी दोन ते तीन दिवसांनंतर नूतन मंत्री शपथ घेतील. दि. 24 पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. खातेवाटपाची जबाबदारी मुख्यमंत्री व पक्षश्रेष्ठींची असून, ते निर्णय घेतील, असेही उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी सांगितले.