म्हैसूर : कर्नाटकात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. म्हैसूर येथे बस आणि इन्होवा कारची समोरा-समोर धडक झाली आहे. ही धडक एवढी भीषण होती की कारच्या चिंधड्या उडाल्या आहेत. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी आहे. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
म्हैसूरमधील तिरुमकूडलु नरसीपुर येथे हा अपघात झाला आहे. बस आणि इन्होवा कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात इन्होवा कारच्या चिंधड्या उडाल्या. यात २ लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळतात पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. तसेच, जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर जखमींवर व्यवस्थित उपचार होत आहेत की नाही याच्या देखरेखीचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी या अपघातावर प्रतिक्रिया देताना शोक व्यक्त केला आहे. “या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांसह झालेल्या मानवी हानीबद्दल दुःख झालं असून मृतांच्या कुटुंबांचं मी सांत्वन करते तसेच जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करते” असं राष्ट्रपतींनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta