बेळगाव : शाळांत यापुढे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे वाहावे लागणार नसून, शिक्षण खात्याने हा दिवस ‘नो बॅग डे किंवा सेलिब्रेशन सॅटर्डे’ म्हणून घोषित केला आहे. आनंदी वातावरणात मुलांना इतर शैक्षणिक उपक्रम शिकविले जाणार आहेत.
राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (डीएसईआरटी) चालू शैक्षणिक वर्षात दर तिसऱ्या शनिवारी मुलांना बहुआयामी उपक्रमांत गुंतवून नागरी चेतना जागृत करण्यासाठी विविध विषयांतील विद्यार्थ्यांसाठी १० स्वयं-स्पष्टीकरणात्मक मॉड्यूल आणि शिक्षकांसाठी एक मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे. हे उपक्रम कसे राबवावेत याबाबत जिल्हा,
तालुका व क्लस्टर स्तरावर होणाऱ्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ‘नो बॅग डे’ची अंमलबजावणी व्यवस्थित होते आहे की, नाही हे पाहण्यासाठी सर्व जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांना शनिवारी शाळांना भेट देऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यास सांगितले आहे. दर महिन्याला याचा अहवाल डीएसईआरटीच्या संकेतस्थळावर अपलोड करावा लागणार आहे. मुलांना घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षित तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षितता आणि सुरक्षा, सार्वजनिक सुविधा, रस्ते सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छता, औषधे, लैंगिक समानता, निरोगी जीवनशैली आणि बरेच काही शिकवले जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta