मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाबाबत उलट-सुलट चर्चा
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचे वक्तव्य केल्याने काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री म्हणून सिध्दरामय्या यांनी केवळ सहा महिने पूर्ण केले असताना अचानक पुढची पाच वर्षे मीच मुख्यमंत्री असे विधान केले, या विधानामागचा नेमका हेतू काय? असा आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
काल होस्पेट येथे बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ मीच पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य केले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून, काँग्रेसमध्येही विरोधी मत व्यक्त केले जात आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाच वर्षांसाठी आपणच मुख्यमंत्री रहाणार असल्याचे विधान केल्यानंतर अडीच वर्षांनी मुख्यमंत्री होऊ इच्छिणारे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यावर प्रतिक्रीया देण्यास नकार दिला. मी फक्त हायकमांडचेच ऐकणार असल्याचे त्यांनी मार्मिक विधान केले. त्यांच्या या वक्तव्याचीही आता जोरात चर्चा आहे. यावर अनेक मंत्री आणि आमदारानी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा अर्थाने बोलून, आगामी काळात मुख्यमंत्रिपदाच्या सत्तावाटपाबाबत स्पष्ट मत व्यक्त न करता, काँग्रेसमध्ये आगामी काळात कांहीही होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत. हायकमांडच्या आदेशानंतरही मुख्यमंत्री पदाबाबत मंत्री आणि आमदारांची वक्तव्ये सुरूच आहेत.
प्रियंका खर्गे यांचे वक्तव्य
म्हैसूरमध्ये मंत्री प्रियंक खर्गे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे हे वैयक्तिक वक्तव्य आहे. कोणाला मुख्यमंत्री करायचे आणि कोणाला कायम करायचे हे हायकमांड ठरवते. दिल्लीत सत्तावाटपावर चार जण बसून बोलले. केवळ त्यांच्याकडे या प्रकरणाची स्पष्टता आहे. मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य वैयक्तिक मत आहे. जिल्हा पंचायत सदस्यांपासून ते आमदारांपर्यंत काँग्रेसमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. यात काही गैर नाही. मात्र सर्व काही पक्ष हायकमांडच ठरवेल, असे सांगत त्यांनी सिद्धरामय्या यांच्या बोलण्याला तिखट प्रत्युत्तर दिले.
मी सिद्धरामय्यांचा समर्थक
तुमकूरमध्ये बोलताना सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी प्रतिक्रीया दिली. गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर देखील भाग्यवान असल्याचे सांगून त्यांनी परमेश्वर मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिले. सिद्धरामय्या यांना आता मुख्यमंत्री पद पुरे असे वाटत असेल तर नवीन मुख्यमंत्री निवडताना परमेश्वर हेच मुख्यमंत्री व्हायला हवेत. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही नेहमीच सिद्धरामय्या यांच्या बाजूने आलो आहोत.
सिद्धरामय्या, शिवकुमारनाच माहीत
मुख्यमंत्री पाच वर्षे की अडीच वर्षे याची केवळ सिध्दरामय्या, डी. के, शिवकुमार यांनाच माहिती आहे. याबद्दल आपल्यापैकी कोणालाच माहिती नाही, असे तुमकूर येथे बोलताना गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले. दिल्लीतील नेत्यांनी सरकार स्थापनेदरम्यान काय निर्णय घेतला हे फक्त सीएम-डीसीएमलाच माहीत. मी खरे काय आणि खोटे काय याचा न्याय करू शकत नाही, असे परमेश्वर म्हणाले.
रामनगरचे आमदार इक्बाल हुसेन यांनीही सिद्धरामय्या यांच्या विधानाला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री व्हावेत, ही आपल्या सर्वांची इच्छा असल्याचे त्यानी म्हटले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विधानाला काँग्रेसमधील अनेक लोक विरोध करत आहेत, हे लक्षात घेता मुख्यमंत्रीपदासाठी लढाई सुरू असल्याचे नाकारता येत नाही. येत्या काही दिवसांत ती तीव्र होणार आहे.
दोन दिवसांपूर्वीच एआयसीसीचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला आणि के. सी. वेणुगोपाल, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या सोबत दोन तासांहून अधिक वेळ बैठक घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कोणत्याही मुद्द्यावर कोणीही उघडपणे बोलू नये, असा इशारा दिला. पण बोलणे अद्यापही थांबलेले नाही.
वरिष्ठांनी इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सत्तावाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आल्याने काँग्रेस हायकमांडलाही लाज वाटली आहे. यावर हायकमांड आता काय संदेश देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिवकुमारांची गुप्त चाल
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया न देता मी हायकमांडचे म्हणणे ऐकून घेईन, पक्षात कोणताही असंतोष नसल्याचे उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणत असले तरी ते शांत बसणारे नाहीत. हायकमांड स्तरावर काय होणार याविषयी आता औत्सुक्य आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बोलण्यावर शिवकुमार यांनी उघडपणे काहीही मत व्यक्त केलेले नाही. मात्र आगामी काळात त्यांची वाटचाल कशी असेल, अशी चर्चा रंगू लागली असून, शिवकुमार यांची ही वाटचाल सध्या तरी गूढच असल्याचे दिसत आहे.
मंत्र्यांना आज स्नेहभोजनाचे निमंत्रण
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेसमधील मुख्यमंत्रीपदावरील चर्चेला पूर्णविराम आणण्यासाठी उद्या सर्व मंत्र्यांची आपल्या निवासस्थानी उपहार बैठक बोलावली आहे. पुढील लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते. यासाठी सर्व मंत्र्यांना उद्या न्याहारीसाठी आपल्या निवासस्थानी येण्याचे त्यांनी निमंत्रण दिले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या सध्या उत्तर कर्नाटकच्या दौऱ्यावर असून ते आज संध्याकाळी बंगळुरला परतणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta