बेंगळुरू : बेल्लारी येथील भाजप खासदार देवेंद्रप्पा यांच्या मुलाने आपली फसवणूक केल्याचा आरोप करत एका तरुणीने बेंगळुरूमधील बसवानगुडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
खासदार देवेंद्रप्पा यांचा मुलगा रंगनाथ याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. म्हैसूर महाराजा कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करणाऱ्या रंगनाथने प्रेमाच्या नावाखाली बंगळुरू येथील एका तरुणीची फसवणूक केली. त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दीड वर्षापूर्वी एका पार्टीत भेटलेल्या रंगनाथने नंतर मैत्री आणि प्रेमातून या तरुणीशी लग्न करणार असल्याचे सांगितले. तिला म्हैसूर येथील एका लॉजमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केले. आता लग्नाला नकार देत असल्याने पीडितेने बसवनगुडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रंगनाथविरुद्ध आयपीसी कलम ४२०, ४१७, ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाच्या संदर्भात, बसवनगुडी महिला पोलिस स्टेशनने पीडित आणि आरोपी दोघांनाही सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.
दरम्यान, खासदाराचा मुलगा रंगनाथ यानेही म्हैसूर येथील तरुणीवर ब्लॅकमेल केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली.