चिक्कबळ्ळापूर : दहावीच्या विद्यार्थ्यासह शाळेच्या सहलीदरम्यान रोमॅंटिक पोज देत फोटो काढणाऱ्या एका शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून कर्नाटकातील मुरुगमल्ला व्हिलेज गव्हर्नमेंट हायस्कूलच्या मुख्यध्यापिका पुष्पलता आर. यांना निलंबित करण्यात आले आहे. हे वादग्रस्त कथित ‘फोटोशूट’ चिक्कबळ्ळापूर येथे एका शैक्षणिक सहलीदरम्यान घडले. फोटोंमध्ये मुख्याध्यापिका विद्यार्थ्याला मिठी मारताना आणि चुंबन घेताना दिसत आहे आणि एका फोटोमध्ये त्याने तिला वर उचलले आहे. X आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक वापरकर्त्यांद्वारे हे फोटो शेअर करण्यात आले होते. यावरून पालकांनी सुद्धा प्रचंड संताप व्यक्त केला होता तर अनेकांनी मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी केली होती.अमित सिंग राजावत या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोला कॅप्शन देत युजरने म्हटले होते की, “एक समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? कर्नाटकातील मुरुगमल्ला चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यात इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यासह सरकारी शाळेतील शिक्षिकेचे रोमँटिक फोटोशूटचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी मुख्याध्यापिकेच्या वर्तनाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत पालकांनी ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर (बीईओ) कडे तक्रार सुद्धा केली आहे.
दरम्यान, तक्रार प्राप्त झाल्यानंतर, बीईओ, व्ही उमादेवी यांनी शाळेला भेट दिली आणि चौकशी केली आणि त्यानंतर शिक्षकाला निलंबित करण्यात आले. चिक्कबळ्ळापूर जिल्हा शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी बीईओच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई केल्याचे वृत्त आहे. सार्वजनिक सूचना उपसंचालक (डीडीपीआय) बैलांजनेप्पा यांनी मुख्याध्यापिकेला निलंबित करण्याचा आदेश जारी केला होता. पुष्पलता आर. यांना नंतर शाळेच्या अधिकाऱ्यांनी फोटोशूटबद्दल विचारले असता तिने त्यांना सांगितले की हे “आई-मुलाचे नाते” आहे आणि त्याच भावनेतून त्यांनी पोज दिल्या होत्या. विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनीही दावा केला आहे की फोटो खासगी होते आणि लीक झाले, त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.