बंगळूर : विधानसौधमध्ये पाकिस्तान समर्थक घोषणा देणाऱ्यांना हजर करावे, या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्य सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत काल विधानसभेत आंदोलन सुरू ठेवलेल्या भाजप आमदारांनी आजही धरणे आंदोलन पुढे चालूच ठेवले. सभागृदात कागदपत्रे फाडून सरकारविरोधात घोषणाबाजी केली व मुख्यमंत्र्यांच्या उत्तरादरम्यान सभात्याग केला.
आज सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू झाले असता, भाजप आमदारांनी सभाध्यक्षांच्या आसनासमोर ठिय्या मांडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सर्व जग आमच्याकडे पाहत असल्याचे विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले. मात्र, गद्दारांवर कारवाई झाली नाही. कोणालाही अटक करण्यात आली नाही. सरकार गप्प आहे. तसे असेल तर यातून राज्यातील जनतेला काय संदेश जाईल? संरक्षण देण्याच्या उद्देशाने आम्हाला निवडून पाठवले आहे. विधानसौधला दहशतवाद्यांचे ठिकाण बनू द्यावे का, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
या विषयावर काल चर्चा झाल्याचे अध्यक्ष यु. टी. खादर यांनी सांगितले. सरकारने उत्तर दिले आहे. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देतील. भाजप सदस्यांनी धरणे आंदोलन मागे घेऊन प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले. त्यानंतर आर. अशोक यांनी, कोलारमध्ये यापूर्वी दलितांना जाळले. तत्कालीन गृहमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठकीत अश्रू ढाळले. हीच त्यांची चिंता आहे. पण या सरकारची जबाबदारी नाही. त्यांनी त्यांच्यावर नैतिकदृष्ट्या जबाबदार नसल्याचा आरोप केला.
विरोधी पक्षनेत्यांनी काल उपस्थित केलेल्या मुद्द्यावर हस्तक्षेप करून गृहराज्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी उत्तर दिले. ‘त्या’ घटनेसंदर्भात सात जणांना बोलावून त्यांचे जबाब घेण्यात आले. तपास सुरूच आहे. प्रत्येक माध्यमाने ते वेगळे सांगितले आहे. तांत्रिकदृष्ट्या त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल मागवण्यात आला आहे. सरकारने ही घटना गांभीर्याने घेतली आहे. आरोपाप्रमाणे पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्यास आम्ही अशा लोकांवर कडक कारवाई करू. कोणाच्याही सुरक्षेचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले.
मात्र, असंतुष्ट भाजप आमदारांनी आपले धरणे आंदोलन सुरूच ठेवत घोषणाबाजी केली. मग सभाध्यक्ष म्हणाले, गरिबांना उपाशी ठेवावे का? सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा करायची नाही का, असा प्रश्न त्यांनी केला. तरीही त्यांचे म्हणणे ऐकून न घेणाऱ्या विरोधी सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रत्युत्तर देत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांविरुध्द आम्ही कडक कारवाई करू, अशी ग्वाही दिली. त्यावर अशोक पुन्हा बोलू लागले. घोषणा देणाऱ्यांना चौकशी करण्यासाठी बोलाऊन परत पाठवले. त्याऐवजी त्यांना बिर्याणी द्यायला हवी होती आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करायला हवा होता, असा टोला त्यांनी लगावला.
त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला नाही. त्याना अटक झाली नाही. सरकारकडे कोणती नैतिकता आहे? असा आक्षेप त्यांनी घेतला. भाजपच्या सदस्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून सभाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर देण्यास सांगितले. एकीकडे मुख्यमंत्री अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तरे देत असताना दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी ठिय्या मांडला, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, कागदपत्रे फाडली आणि सभाध्यक्षांच्या आसनासमोर गोंधळ घातला.
धजद सदस्यांनीही या धरणे आंदोलनात सहभागी होऊन भाजप आमदारांच्या निषेधाला पाठिंबा दिला. काही काळ त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. मात्र, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उत्तरे देणे सुरूच ठेवले. यामुळे नाराज झालेल्या भाजप आमदारांनी सभात्याग केला. यावेळी धजद सदस्यांनीही त्यांना साथ दिली.