मंगळूर जिल्हा हदरला
बंगळूर : एकतर्फी प्रेमातून युवकाने केलेल्या अॅसिड हल्ल्यात तीन महाविद्यालयीन युवती जखमी झाल्या. मंगळुरातील कडब येथे ही घटना घडली. या प्रकरणी हल्लेखोरास अटक करण्यात आली आहे. जखमी विद्यार्थिनींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अबिन असे संशयिताचे नाव असून त्याची चौकशी केली जात आहे.
तीन विद्यार्थिनी कडब येथील पदवीपूर्व महाविद्यालयात बारावीत शिकत आहेत. परीक्षेनिमित्त महाविद्यालय आवारात असताना मास्क आणि टोपी घातलेल्या हल्लेखोराने अचानक येऊन तिघींच्याही तोंडावर अॅसिड फेकले. यामुळे त्यांनी आरडाओरडा केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. चेहर्यावर गंभीर जखमा झाल्याने अधिक उपचारासाठी मंगळूर जिल्हा रुग्णालयात हालविण्यात आले.
हा हल्ला एकतर्फी प्रेमातून झाल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. संशयित अबिन हा एका विद्यार्थिनीवर प्रेम करत होता. तो मूळचा केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील नेलंबूर येथील आहे. तो एकतर्फी प्रेम करत होता. पण नकार दिल्याने नैराश्य आलेल्या अबिनने परीक्षेच्या वेळी विद्यार्थिनीवर हल्ल्याचा कट आखला. तिच्यासोबत मैत्रिणीही होत्या. तिघींवरही त्याने अॅसिड फेकले. तो फरारी होण्याच्या प्रयत्नात असताना घटनास्थळी असणार्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेमुळे घबराट निर्माण झाली. त्यामुळे महाविद्यालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुलींच्या पालकांनी तसेच इतरांनी रुग्णालयासमोर गर्दी करुन आक्रोश केल्याने तेथे तणाव निर्माण झाला होता. त्या ठिकाणीही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.