बंगळुरू : आम्ही केलेल्या सर्व सर्वेक्षणांमध्ये बेळगावमधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास उत्तर कन्नड जिल्हा आणि बेळगाव जिल्ह्यांसह तिन्ही लोकसभा मतदारसंघ जिंकता येतील, असे आवाहन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.
बंगळुरू येथील मुख्यमंत्र्यांच्या कावेरी या शासकीय निवासस्थानी सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघ आणि दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातही आपण विजय मिळवू शकतो. पाच हमी योजनांचा बेळगाव जिल्ह्यातील लाखो कुटुंबे आणि महिलांना लाभ झाला आहे. 80% युवती आणि महिला आमच्या बाजूने असल्याचे सकारात्मक अहवाल सर्वेक्षणातून समोर आले आहेत. प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 5-6 हजार रुपये दिले जात आहेत, प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात दरवर्षी 50-60 हजार जमा होत आहेत, लोकांमध्ये संघटितपणे, खंबीरपणे उभे रहा आणि विजयी व्हा, असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या दारात जाऊन सरकारी योजनांचे महत्व त्यांना पटवून देण्याचे आवाहन केले.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, सतीश जारकीहोळी यांच्यासह माजी मंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, माजी मंत्री, माजी आमदार, विधान परिषद सदस्य आणि 40 हून अधिक जिल्ह्यातील नेत्यांनी या बैठकीत मनोगत व्यक्त केले.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार लक्ष्मण सवदी म्हणाले की, यावेळी बेळगाव आणि चिक्कोडी हे दोन लोकसभा मतदारसंघ आपण जिंकू, हे बेळगावच्या जनतेने आधीच ठरवले आहे. बेळगावात जगदीश शेट्टर यांचा पराभव निश्चित आहे.
बेळगाव बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी बंगळूरू येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा त्यांच्या निवासस्थानी कावेरी येथे सत्कार केला. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील आमदार उपस्थितीत होते.
यावेळी बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला बालकल्याण मंत्री, लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार लक्ष्मण सवदी, आमदार राजू कागे, आमदार गणेश हुक्केरी आमदार महेंद्र तमन्ना, महांतेश कौजलगी, आमदार विश्वास वैद्य, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार आसीफ उर्फ राजू शेठ, आमदार, चन्नराज हट्टीहोळी, माजी आमदार एस. बी. घाटगे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील अंजली निंबाळकर, महावीर मोहिते, सुनील हनमन्नावर, बेळगाव ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष विनय नावलगट्टी, अथणीचे चिदानंद मुकणी, अमोल बन्ने, प्रमोदकुमार पाटील, रमेश जाधव, रमेश पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.