बंगळूर : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, भाजप आणि धजद यांच्यातील जागा वाटप अखेर निश्चित झाले आहे. भारतीय जनता पक्षाने कर्नाटकातील २८ मतदारसंघांपैकी हसन, मंड्या आणि कोलार लोकसभा मतदारसंघ धर्मनिरपेक्ष जनता दलाला (धजद) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागावाटपाच्या अनिश्चिततेचा तिढा आता सुटला आहे. यासंदर्भात कर्नाटक भाजपचे निवडणूक प्रभारी राधामोहन दास अग्रवाल यांनी अधिकृत माहिती दिली, की कोलार, मंड्या आणि हसन लोकसभा मतदारसंघ धजदला देण्यात आले आहेत. या तिन्ही क्षेत्रात आपण धजदला पाठिंबा दिला पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांनी हसन आणि कोलारमध्ये धजदला विरोध करणाऱ्या भाजप नेत्यांना युतीचे धोरण अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत. मंड्याच्या अपक्ष खासदार सुमलता अंबरीश यांनी भाजपला पाठिंबा दिला. एस मुनीस्वामी कोलारमध्ये भाजपचे खासदार होते. पण, आता हे दोन्ही मतदारसंघ भाजपने धजदला दिल्याने हे दोन्ही मतदारसंघ गमावले आहेत. पण, तीन क्षेत्रात युती धर्म पाळला जाईल का? धजद उमेदवारांच्या विजयासाठी भाजप नेते मेहनत करतील का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मंड्यात सुमलताच्या वाटचालीचे औत्सुक्य अधिकृतपणे मंड्या लोकसभा मतदारसंघ धजदकडे गेला आहे. युतीपूर्वी भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष खासदार सुमलता अंबरीश आता अतंत्र स्थितीत आहेत. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी मंड्यातून मंड्या वगळून इतर कोणत्याही मतदारसंघातून निवडणुक लढविणार नाही. मला १०० टक्के भाजपचे तिकीट मिळेल, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या सुमलता अंबरीश यांची मोठी अडचण झाली आहे. आता मंड्या मतदारसंघ अधिकृतपणे धजदकडे गेल्याने सुमलता अंबरीश पुढे काय करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोलारमध्ये मुनीस्वामी मैत्रीधर्म पाळणार?
एस. मुनीस्वामी कोलार लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार आहेत. मात्र यावेळी कोलार मतदारसंघ धजदला दिल्याने एस. मुनिस्वामी यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुनिस्वामी आता बंडखोरीचा विचार करत आहेत. मुनिस्वामी मैत्रीधर्म पाळणार का, याची वाट पाहावी लागेल.