अधिसूचना जारी
बंगळूर : राज्यातील २६ एप्रिल रोजी होणाऱ्या १४ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील २८ लोकसभा मतदारसंघांपैकी पहिल्या टप्प्यात १४ मतदारसंघात २६ एप्रिल रोजी निवडणूक होणार असून, या निवडणुकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. त्यानुसार आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीची अधिकृत अधिसूचना जाहीर होताच सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप – धजद आघाडीत कडवे निवडणूक युद्ध सुरू झाले आहे.
राज्यातील उडुपी, चिक्कमंगळूर, हसन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, बंगळुर ग्रामीण, बंगळुर उत्तर, बंगळुर दक्षिण, बंगळुर मध्य, चिक्कबळ्ळापूर आणि कोलार मतदारसंघांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे
या निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही सुरुवात झाली आहे. चार एप्रिल उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस. पाच एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. आठ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
२६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, चार जूनला मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघातील निवडणुकीसाठी दररोज सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करण्याची संधी नाही.
राज्यात दोन टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार असून पहिल्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी तर उर्वरित १४ मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात सात मे रोजी मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या सर्व २५ उमेदवारांची नावे आधीच जाहीर केली आहेत. काँग्रेस पक्षाने चिक्कबळ्ळापूर, कोलार, चामराजनगर आणि बेळ्ळारी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अद्याप निश्चित केलेले नाहीत.