बंगळूर : अभिनेत्री आणि मंड्यातील अपक्ष खासदार सुमलता अंबरीश यांनी शुक्रवारी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला.
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, विरोधी पक्षनेते आर. अशोक, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कर्नाटक निवडणूक प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस राधामोहन दास अग्रवाल, माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा उपस्थित होते.
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुमलता यांनी अंबरीश यांच्या समाधीला भेट दिली आणि पूजा केली. सध्याची लोकसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयापासून मागे हटलेल्या सुमलता यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. बुधवारी समर्थकांच्या बैठकीत बोलताना त्या म्हणाल्या की, तिकीट न मिळाल्यास अनेक राजकारणी पक्ष बदलतील. पण, मी तिकीट सोडून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना सुमलता म्हणाल्या की, भाजपमध्ये प्रवेश करणे ही माझी सर्वोत्तम निवड होती, बोम्मई यांनी मला ५० कोटीचे अनुदान दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूरमध्ये माझ्यासाठी जे केले ते मी विसरू शकत नाही, मंड्या जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेले योगदान भाजपच्या वाट्याला गेले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
मंड्यामध्ये तिकिटासाठी इच्छुक असलेल्या सुमलता यांना भाजप आणि धजद युतीमुळे मोठा धक्का बसला आहे. एच. डी. कुमारस्वामी एनडीएचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. या संदर्भात त्यांचे राजकीय भवितव्य लक्षात घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सुमलता यांनी २०१९ मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली, सुमलताने मंड्यामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या धजद उमेदवार निखिल कुमारस्वामीविरुद्ध प्रचंड विजय मिळवला होता.