बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात (बिम्स) कोरोना रुग्णासोबत येणाऱ्या इतरांना / अटेंडरना आत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तरीही संबंधीत या आदेशाला जुमानत नसल्याने रविवारपासून जिल्हा रुग्णालयातील विविध विभागात पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांसोबत त्यांची देखभाल करण्यासाठी आलेल्यांनाही कोरोनाची बाधा होत असल्याने संबंधितांना आपत्कालीन विभाग, मेडिकल वार्ड आणि प्रसुतिगृहात प्रवेश करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
तरीही काहीजण विविध विभागात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाकडून पोलीस खात्याकडे बंदोबस्त देण्यासाठी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार एपीएमसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी रविवारी जिल्हा रुग्णालयातील विविध विभागात पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कोविड वॉर्डमध्ये रुग्णांचे नातेवाईक बिनदिक्कतपणे प्रवेश करीत असल्याचे निदर्शनास आले असून यापुढे अनधिकृतपणे प्रवेशास निर्बंध असेल. रुग्णाला भेटीसाठी बिम्स प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असेल, असे बिम्सचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी कळविले आहे.
रुग्णांशिवाय इतरांनी प्रवेश करू नये, यासाठी बाहेर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांशिवाय इतरांना कोविड वार्डमध्येही नो-एन्ट्री आहे. डॉ. दास्तीकोप्प यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कोविड रुग्णाला भेटण्यासाठी येणारे नातेवाईक नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे ते स्वतः बाधित बनतात. याशिवाय संसर्ग पसरण्यास कारणीभूत ठरतात. रुग्णाला भेटण्याची गरजच असल्यास नातेवाईकांनी बिम्स प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी. संसर्ग वाढल्यामुळे उद्भवलेली परिस्थिती जाणून प्रशासनाला सहकार्य करणे हिताचे ठरेल.
बिम्सच्या आवारात काही रुग्णवाहिका, शववाहिका, रिक्षा अनधिकृतपणे उभ्या असतात. बाह्यरुग्ण विभाग, तातडीचा चिकित्सा विभाग, शवागारानजीक गलका सुरू असतो, असेही निदर्शनास आले आहे. यामुळे गैरसमज होतो. दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृददेह जागेवरून उचलण्यासाठी मोठ्या पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारीही असून यामध्ये बिम्सच्या कर्मचाऱ्यांचे नाव गोवण्यात येत आहे. बिम्सचे कर्मचारी अशी कृती करीत नाहीत. अफवांवर विश्वास ठेवू नये. यापुढे बिम्सच्या आवारात वाहनांना अनधिकृतपणे प्रवेशास निर्बंध असेल. अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा डॉ. दास्तीकोप्प यांनी दिला आहे.
Check Also
शिवाजी विद्यालय येळ्ळूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभिप्रेरणा कार्यक्रम संपन्न
Spread the love येळ्ळूर : येथील श्री शिवाजी विद्यालयामध्ये जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय बेळगाव दक्षिण …