Sunday , September 8 2024
Breaking News

बोरगाववर उत्तम पाटील गटाचे वर्चस्व कायम

Spread the love

हवले गटाला एक जागा : भाजपाला खाते खोलणे अशक्य
निपाणी (वार्ता) : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बोरगाव नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची गुरुवारी (ता. 30) येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात मतमोजणी झाली. त्यामध्ये उत्तम पाटील गटाच्या ग्रामविकास पॅनेलने जोरदार मुसंडी मारुन 17 पैकी 16 जागा हस्तगत केल्या. तर हवले गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. मात्र यावेळी भाजपाला आपले खाते खोलणेही अशक्य झाले. त्यामुळे या नगरपंचायतीवर उत्तम पाटील गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे. सकाळी 8 वाजता तहसीलदार डॉ. मोहन भस्मे, मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या उपस्थितीत मतमोजणीला प्रारंभ झाला. मतदान ईव्हीएम मशीनवर झाल्याने निकाल तातडीने लागत होता. यावेळी प्रत्येक प्रभागातील उमेदवारांना टप्प्याटप्प्याने बोलावून मतमोजणी सुरु होती. सकाळी 10.30 वाजताच सर्व निकाल संपुष्टात आला. सुरुवातीपासून उत्तम पाटील गटाच्या ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार विजयी होत होते. तर अण्णासाहेब हवले गटाचा एकच उमेदवार विजयी झाला. अखेरपर्यंत भाजपाला एकही जागा मिळाली नाही.
निकालानंतर विजयोत्सव व मिरवणुकीवर बंदी घातल्याने मतमोजणी परिसर व शहरात शुकशुकाट होता. दुपारी 12 नंतर सर्व विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र दिल्यानंतर उत्तम पाटील गटाचे उमेदवार व कार्यकर्त्यांनी बोरगाव येथे जावून सहकाररत्न रावसाहेब पाटील, युवा उद्योजक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांची भेट घेतली. चिक्कोडीचे पोलिस उपअधिक्षक मनोजकुमार नायक यांच्या नेतृत्वाखाली मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी व शहर, ग्रामीण, बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षकांसह कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
———
आठवडी बाजार बंद
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. 30) भरणारा आठवडी बाजार रद्द केला होता. त्यामुळे शहरात सर्वत्र नागरिकांची वर्दळ अत्यल्प दिसून आली.
——-
प्रभागनिहाय विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते
प्रभाग 1 शरद जंगटे (752), प्रभाग 2 भारती वसवाडे (445), प्रभाग 3 सुवर्णा सोबाणे (292), प्रभाग 4 वर्षा मनगुत्ते (352), प्रभाग 5 जावेद मकानदार (462), प्रभाग 6 पिंटू कांबळे (303), प्रभाग 7 प्रदीप माळी (342), प्रभाग 8 रोहित पाटील (358), प्रभाग 9 संगीता शिंगे (466), प्रभाग 10 दिगंबर कांबळे (400), प्रभाग 11 अभयकुमार मगदूम (234), प्रभाग 12 तुळसीदास वसवाडे (180), प्रभाग 13 अश्विनी पवार (186), प्रभाग 14 माणिक कुंभार (326), प्रभाग 15 गिरीजा वठारे (258), प्रभाग 16 शोभा हवले (340), प्रभाग 17 रुक्साना अपराज (246).

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *