
बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील सुक्षेत्र येडूर ग्रामी श्री वीरभद्रेश्वर आणि भद्रकाळी देवीच्या कल्याण महोत्सवानिमित्त श्री वीरभद्रेश्वराचा रौप्य रथोत्सव महिलांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला. श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात नीलांबिका प्रकाश हुक्केरी यांनी रथोत्सवास हिरवा कंदिल दाखवला.
यावेळी महिलांनी अत्यंत भक्तीभावाने रौप्य रथ ओढला. ‘हर हर महादेव’ आणि ‘श्री वीरभद्रेश्वर महाराज की जय’ अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. भाविकांनी रथावर साखर, केळी, खारीक, खोबऱ्याची उधळण करत सहभाग घेतला. रथोत्सवाच्या अग्रभागी हत्ती, घोडे आणि नंदी भाविकांचे आकर्षण ठरले. सदर रथोत्सव काडसिद्धेश्वर मठापासून सुरू होऊन श्री वीरभद्रेश्वर मंदिर, चन्नम्मा चौक आणि जुन्या येडूरमधील बसवेश्वर मंदिरमार्गे मार्गस्थ झाला. शेवटी पुन्हा वीरभद्रेश्वर मंदिरात येऊन या सोहळ्याची सांगता झाली. यावेळी विविध मठाधीश, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta