
बेळगाव : माझ्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी होऊ द्या, मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे, मात्र मी राजीनामा देणार नाही, असे विधान ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केले आहे.
बेळगावमधील ठेकेदार संतोष पाटील यांनी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्या नावे डेथ नोट लिहून आत्महत्या केली आहे. संतोष पाटील यांनी आपल्यावर केलेल्या आरोपासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी शिमोगा येथे आपल्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माझ्यावर झालेल्या आरोपा संदर्भात मी संपूर्ण चौकशीसाठी तयार आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी परंतु मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही, असे स्पष्टीकरण मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी दिले आहे.
आपल्या विभागात काम करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सरकारी नियमांची पूर्तता झाल्यावरच निधी देण्याची परवानगी आहे. मात्र माझ्यावर विरोधक देखील आरोप करत असून विरोधकांनी काम पूर्ण होण्याआधी पैसे दिले आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मंत्री के. एस. ईश्वरप्पा पुढे म्हणाले की, संतोष पाटील यांनी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली आहे याचा तपास झाला पाहिजे. संतोष पाटील यांनी लिहिलेली डेथ नोट ही व्हाट्सअपवर आहे. त्यामुळे मृत संतोष यांच्या मृत्यूची नोंद घेऊन तपास करण्यात यावा. यासाठी माझा राजीनामा कशासाठी हवा? असा सवाल उपस्थित करून विरोधक काहीही म्हणू दे परंतु याप्रकरणी माझे नाव बदनाम करण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आले आहे, असा आरोप देखील मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केला.
Belgaum Varta Belgaum Varta