
बेळगावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ जयंती उत्साहात
बेळगाव : जात-पात, धर्माचा विचार न करता देशातील सर्व वर्गातील लोकांच्या हिताचा विचार करणारी राज्यघटना निर्माण करण्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते. आंबेडकरांनी निर्माण केलेली देशाची राज्यघटना हा आपल्या देशाचा धर्मग्रंथ आहे, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती सोहळ्या निमित्ताने बेळगाव येथील डॉ. आंबेडकर पार्क येथे आज गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून शोषितांना न्याय दिला. प्रत्येकाने शिक्षित होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन शासकीय लाभ मिळवावेत. शिक्षणातूनच प्रगती शक्य आहे. त्यामुळे शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. डॉ. आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे किंवा ज्ञानाचे वर्णन करणे म्हणजे समुद्रातील पाण्याच्या थेंबाबद्दल बोलण्यासारखे असल्याचे हे मंत्री कारजोळ यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आम. सतीश जारकीहोळी म्हणाले, दरवर्षी आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने नवनवीन चांगल्या विचारांचा प्रसार व्हायला हवा. आंबेडकर जयंती एका दिवसापुरती मर्यादित राहू नये. बाबासाहेबांच्या आचार विचारांची प्रत्येकाने सातत्याने कास धरावी. शांती आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या भगवान बुद्ध आणि छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बेळगावात उभारण्यात यावा. असेही त्यांनी सांगितले
आमदार अनिल बेनके म्हणाले, बाबासाहेबांनी बेळगावला दोनदा भेट दिली ही अभिमानाची बाब आहे. आंबेडकरांनी बेळगावात वास्तव केलेल्या ठिकाणी स्मारकाची उभारणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सरजू काटकर यांच्या पुस्तिकेचे प्रकाशन मंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार मंगला अंगडी, आम.अनिल बेनके, आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, विभागीय आयुक्त अमलन आदित्य बिस्वास, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, दलित संघटनेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शहरातील धर्मवीर संभाजी सर्कल येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत जिल्ह्यातील विविध भागातून हजारो नागरिक सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta