
बेळगाव : मयत संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणी रोज धक्कादायक माहिती उजेडात येत असून या प्रकरणी आता माजी जिल्हा पंचायत अध्यक्षांचे नावदेखील चर्चेत आले आहे. हिंडलगा ग्रामपंचायत व्याप्तीत करण्यात आलेल्या विकासकामांच्या कागदपत्रांवर माजी जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यासंदर्भात जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी तपासाअंती सर्व माहिती बाहेर येईल, असे सांगितले.
जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग कार्यदर्शींना पाठविलेल्या पात्रासंदर्भात स्पष्टीकरण दिले. कोणत्याही निवेदनावर स्वाक्षरी करणे हे साहजिक आहे. त्या निवेदनाचा स्वीकार करून संबंधित विभागाला सुपूर्द करणे हे त्यांचे काम आहे. माजी जिल्हा पंचायत अध्यक्षांनी राज्य विभागाच्या प्रधान सचिवांना १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पत्र पाठविले होते. या पात्रात १०८ विकासकामांचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र पत्राच्या शेवटी असलेली स्वाक्षरी हि आपली नसल्याचे आशा ऐहोळे सांगत आहेत. कोणत्याही कामकाजाच्या मंजुरीसाठी सरकारी नियम आणि फाईल नोटिफिकेशन असणे आवश्यक आहे. सरकारी पातळीवरील सचिव, जिल्हास्तरीय पातळीवर आपले अनुमोदन असणे गरजेचे आहे. मात्र या कामकाजासाठी आपल्याकडे कोणत्याही गोष्टी मंजुरीसाठी आल्या नाहीत. किंवा जिल्हा पंचायत स्तरावर अनुमोदनासाठी पोहोचलेल्या नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात आपण आशा ऐहोळे यांच्याशी संपर्क साधला असता सदर स्वाक्षऱ्या आपल्या नसल्याचे त्यांनी सांगितले आहे, असे दर्शन एच. व्ही. यांनी सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास होत असून याबाबत अधिक आपण काहीच सांगू शकत नसल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात सर्व माहिती पोलीस तपासात उघड होईल, असे दर्शन एच. व्ही. यांनी स्पष्ट केलेयावेळी हिंडलगा व्याप्तीत झालेल्या १०८ कामकाजासंदर्भात आश्चर्य व्यक्त करत हिंडलगा गावात झालेल्या या घटनेबद्दल आपल्याला आश्चर्य असल्याचे दर्शन म्हणाले. शिवाय या प्रकरणातील ठेकेदारांशी आपली भेट झाली नसल्याचेही ते म्हणाले. पंधराव्या वित्त आयोगानुसार कमीतकमी ५० ते ६० लाख रुपये पैसे जमा होतात. मात्र आतापर्यंत ४ कोटी रुपयांचा निधी कधीही जमा झाला नसल्याचे ते म्हणाले. या प्रकरणाशी संबंधित माझ्याकडे असलेली माहिती आपण पोलिसांना देणार असून पोलीस तपासाअंती सर्व काही स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. संपूर्ण राज्यभरात सध्या संतोष पाटील आत्महत्या आणि ४० टक्के कमिशनची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असून या प्रकरणाशी संबंधित अनेक प्रकारच्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास घेत असून उडुपी येथील पोलीस सध्या बेळगावमध्ये तळ ठोकून आहेत. या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत नेमक्या किती गोष्टी उजेडात येतील, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta