
बेळगाव : बेळगाव कॅम्प पोलिस स्टेशनचे असिस्टंट कमिशनर श्री. ए. चंद्रप्पा यांनी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांची आज तातडीची बैठक बोलावून शिवजयंती उत्सव आणि शिवजयंती मिरवणूकीसंदर्भात चर्चा केली. मध्यवर्ती मंडळातर्फे 2 मे 2022 रोजी सकाळी 9 वाजता नरगुंदकर भावे चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार असून 10 वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथे छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. 4 मे 2022 रोजी शिवजयंती उत्सव मंडळातर्फे शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध चित्ररथ यांची मिरवणूक निघणार आहे. या दिवशी सायंकाळी 6 वाजता शिवछत्रपतींच्या पालखीची मिरवणूक मारुती मंदिर मारुती गल्ली येथून निघणार असून नरगुंदकर भावे चौकात प्रशासनाचे अधिकारी व राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या मंडळींच्या हस्ते पूजन होईल. पालखी साधारण रात्री 12 वाजेपर्यंत कपिलेश्वर पुलापर्यंत जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
शिवजयंती उत्सव अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पाडा पण बेळगावमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन असिस्टंट कमिशनर श्री. ए. चंद्रप्पा आणि खडेबाजार सीपीआय श्री. निंबाळकर यांनी केले. याबाबत शिवजयंती उत्सव मंडळ पदाधिकार्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. बसव जयंती, रमजान, शिवजयंती काळात बेळगावातील प्रत्येक समाजाने जबाबदारीने काम करावे, असे ते म्हणाले.
आजच्या बैठकीत श्री. प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, विकास कलघटगी यांनी चर्चेत भाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta