Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगावात जागतिक डेंग्यू निवारण दिनानिमित्त भव्य जागृती जथा

Spread the love

बेळगाव : जागतिक डेंग्यू निवारण दिनानिमित्त बेळगावात सोमवारी भव्य जागृती जथा काढण्यात आला. दरवर्षी 16 मे रोजी जागतिक डेंग्यू निवारण दिन पाळण्यात येतो. त्याचप्रमाणे आज सोमवारी बेळगावात जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, आरोग्य खाते आदींच्या सहभागाने डेंग्यू निवारण दिन पाळून भव्य जागृती जथा काढण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी हिरवे निशाण दाखवून चालना दिली. यावेळी कार्यालयाच्या आवारात आयोजित केलेल्या मेळाव्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी उद्घाटन केले. जिल्हाधिकारी कार्यालयापासून चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौकापर्यंत जागृती जथा काढण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ म्हणाले, बेळगाव शहर आणि ग्रामीण परिसरात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुण्या या डासांपासून पसरणार्‍या सांसर्गिक रोगांबद्दल जनतेत जागृती करण्याच्या हेतूने या जागृती जथ्याचे आयोजन केले आहे. आता लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे या रोगांचा धोका वाढणार आहे. त्यामुळे डासांचा बंदोबस्त करण्यासाठी जैविक पद्धतीने पाणी, कृत्रिम तलावात माशांची पैदास करून डासांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याशिवाय जनतेत डासांच्या नियंत्रणाबाबत जागृती करण्यात येत असल्याचे डॉ. मुन्याळ यांनी सांगितले.
यावेळी बोलताना डॉ. पल्लेद म्हणाले, डेंग्यू दिनानिमित्त राज्यात ‘डेंग्यूवर नियंत्रण शक्य आहे, या हातभार लावा‘ या घोषवाक्यासह डेंग्यू नियंत्रणाची मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी लोकांनी आपला घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवून, घराभोवती पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. जनतेच्या सहकार्यानेच डेंग्यूसारख्या सांसर्गिक रोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. त्यामुळे जनतेने यासाठी खबरदारी घेत सहकार्य करावे असे आवाहन डॉ. पल्लेद यांनी यावेळी केले.
याप्रसंगी डॉ. तुक्कार यांच्यासह सरकारी अधिकारी, वैद्यकीय विद्यार्थी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *