बेळगाव ः बंद घराचा दरवाजा फोडून चोरट्यानी सोन्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २० हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. सोमवार (ता. १६) सकाळी महावीरनगर मजगाव येथे ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राजू शरद लट्टे यांनी या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. फिर्यादी राजू लट्टे यांचे महावीरनगर मजगाव येथे घर असून ते आपल्या कुटुंबियासह रविवार (ता.१४) सायंकाळी ६ च्या दरम्यान आपल्या घराला कुलूप घालून हुक्केरी येथे सासरी गेले होते. चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत शनिवारी (ता.१४) सायंकाळी सहा ते सोमवार (ता. १६) दुपारी बाराच्या दरम्यान त्यांचे घर फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख १८ हजार ५०० रुपयांच्या ऐवज लंपास करून पलायन केले. आज दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ठसे तज्ञ तसेच श्वानपथकला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पोलिस निरीक्षक धीरज शिंदे पुढील तपास करीत आहेत.
