
बेळगाव : हिंदू धर्मात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करून हे व्रत करण्यात येतं. बेळगाव शहर आणि तालुक्यातही आज सवाष्ण महिलांनी वटपौर्णिमा भक्तिभावाने साजरी केली. वटसावित्रीचे व्रत देशभरात विविध नावानी प्रसिद्ध आहे. पौराणिक कथांनुसार महान पतिव्रता सावित्रीने साक्षात यमदेवांशी वादविवाद करून आपला पती सत्यवानाचे प्राण वाचवल्याचे सांगितले जाते. तेंव्हापासून सावित्रीचे अनुकरण करत हिंदू महिला आजच्या दिवशी वडाच्या झाडाला धागा बांधून पूजा करून वटसावित्रीचे व्रत करतात. बेळगावातही आज अनेक ठिकाणी सुवासिनी महिलांनी वडाच्या झाडांना डोरा गुंडाळून पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
शहरातील आरटीओ चौकातील सोन्या मारुती मंदिराच्या आवारात असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आज, मंगळवारी महिलांनी मोठी गर्दी केली. नटूनथटून आलेल्या सर्व वयोगटातील महिलांनी भक्तिभावाने हळदी-कुंकू, द्रोणातून 5 प्रकारची फळे अर्पण करून वडाच्या झाडाची पूजा करून मनोकामना पूर्ण होण्याची प्रार्थना केली.
यासंदर्भात माहिती देताना प्रभावती प्रल्हाद पाटील म्हणाल्या, आजचा वटपौर्णिमेच्या दिवस भारतीय संस्कृतीत पवित्र सण म्हणून साजरा केला जातो. सावित्रीने यमधर्माशी वादविवाद करून पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते. त्यामुळे आजच्या दिवशी वडाच्या झाडाची विशेष पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. 7 जन्म हाच पती मिळो यासाठी प्रार्थना केली जाते.
Belgaum Varta Belgaum Varta