बेळगाव : बेळगाव शहराची वाटचाल स्मार्टसिटीकडे चालू असल्याचे भासवले जात आहे. बेळगावची निवड स्मार्टसिटीमध्ये झालेली आहे. शहराच्या प्रमुख रस्त्यांवर स्वच्छ आणि सुंदर बेळगावच्या दृष्टीने कामही चालू झालेले आहे. मात्र बेळगाव दक्षिणमधील शहापूर, वडगाव, खासबाग या भागाची मात्र उकिरडा सिटी झाली आहे. खासबाग, वडगाव परिसरात बहुतेक ठिकाणी कचरा उघड्यावर पडत आहे. परिणामी या भागात डुकरांचा उपद्रव वाढला आहे. बेळगाव तालुक्यातील बहुतांश गावे डुक्कर मुक्त झालेली आहेत. मात्र शहापूर, वडगाव व खासबाग या भागाला मात्र अद्याप डुक्करांपासून मुक्ती मिळालेली नाही.
खासबाग, वडगाव परिसरात कचरा उघड्यावर टाकण्यात येतो अश्या ठिकाणी डुकरे अन्नाच्या शोधत येत आहेत. अनेक घरांमध्येही डुकरे शिरत आहेत. शहरात स्वच्छतेचा फक्त दिखावा सुरू आहे. उपनगरात मूलभूत सोई आणि स्वच्छतेचा बोजवारा उडालेला पहावयास मिळत आहे.
शहराच्या मुख्य भागातून डुक्करे हटविण्यात आलेली आहेत मात्र उपनगरात आजही मोकाट डुकरे वावरत आहेत. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.
खासबाग बसवेश्वर चौकात तर डुकरांनी हैदोस घातला आहे, घरचा दरवाजा उघड दिसताच ही डुकरे सरळ घरात प्रवेश करत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आपल्या घराचे दरवाजे सदैव बंद ठेवावे लागत आहेत. तरी महानगरपालिकेने त्वरित या मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta