
बेळगाव : अन्नधान्यावर लादण्यात आलेल्या जीएसटीच्या निर्णयाच्या विरोधार्थ आज बेळगावमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात आज आम आदमी पार्टीच्या बेळगाव विभागातर्फे आंदोलन छेडण्यात आले. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, दूध, ताक, दही यावर लादण्यात आलेल्या जीएसटीचा निषेध करत सदर निर्णय सरकारने मागे घ्यावा, असा आग्रह करत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आम आदमी पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली.
यावेळी आम आदमी पक्षाचे उत्तर कर्नाटक विभागाचे प्रभारी राजकुमार टोपण्णावर बोलताना म्हणाले, दैनंदिन वस्तूंवर लादण्यात आलेल्या जीएसटीमुळे लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांवर मोठा परिणाम होईल. याचप्रमाणे कृषी उत्पादनांवरदेखील मोठा परिणाम होईल. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार असून केंद्र सरकारने लादलेली जीएसटी हि निषेधार्ह आहे. केंद्र सरकारने अलीकडेच अन्नधान्य आणि पिकांवर ५ टक्के कर लावला असून त्यामुळे अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने गोरगरीब आणि व्यापाऱ्यांचे हाल होणार आहेत. यामुळे केंद्र सरकारच्या जीएसटी कौन्सिलने तात्काळ आपला आदेश मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात शंकर हेगडे, संजय काकतकर, समीर सय्यद, ए. एम. सनदी आदींसह आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta