बेळगाव : दूध, दही, ताक यासारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात बेळगावमध्ये एसडीपीआय संघटनेने निदर्शने केली. गरिबांच्या जगण्यावर केंद्रातील भाजप सरकारने प्रहार केल्याचा आरोप करत एसडीपीआय संघटनेच्यावतीने बेळगावमध्ये निदर्शने करत आंदोलन छेडण्यात आले. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आलेल्या आंदोलनात एसडीपीआय संघटनेच्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या दरवाढीच्या धोरणाविरोधात हातात फलक घेऊन घोषणा देत संताप व्यक्त केला.
यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना एसडीपीआय नेते अबिद कडोली यांनी सांगितले की, केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या, गरिबांच्या विरोधातील धोरणे अंमलात आणत आहे. पेट्रोल, डिझेल यासह अन्नपदार्थांच्या दरात याआधीच वाढ करण्यात आली आहे. मात्र आता दैनंदिन जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या निर्णयाचा आपण विरोध करत असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही परिस्थितीत तांदूळ आणि दुधावर जीएसटी लावण्यात येणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन फोल ठरले असून सरकार सर्वसामान्यांशी क्रूरपणे वागत असल्याचा आरोप कडोली यांनी केला.
या आंदोलनात एसडीपीआय संघटनेचे नेते वासिम असलम, अब्दुल हमीद, इमरान मुल्ला, नवाज मुल्ला, समीर पारिशवाड, एमडीएफ सोफियान आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta