Thursday , September 19 2024
Breaking News

पायोनियर बँकेला एक कोटी 21 लाखाचा नफा

Spread the love

 

बेळगाव : “116 वर्षाची वाटचाल करीत असलेल्या येथील दि. पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला गेल्या आर्थिक वर्षात एक कोटी 21 लाख 57 हजार इतका निव्वळ नफा झाला असून बँकेच्या आजवरच्या इतिहासात एवढा नफा मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे,” अशी माहिती पायोनियर बँकेचे चेअरमन श्री. प्रदिप अष्टेकर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की,” बँकेची 116 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या शनिवारी दुपारी तीन वाजता बँकेच्या मठ गल्ली बेळगाव येथील मुख्य शाखेत आयोजित करण्यात आली आहे. कोरोनामुळे देशाची आर्थिक घडी बिघडली असताना त्याचा परिणाम बँकिंग क्षेत्रावरही झाला. असे असूनही पायोनियर बँकेने गेल्या वर्षभरात उल्लेखनीय प्रगती केली आहे. बँकेच्या गेल्या 116 वर्षाच्या कारकिर्दीत यंदा पहिल्यांदाच बँकेला ऑडिट रेटिंग ए मिळाले असून प्रथमच बँकेने 100 कोटीच्या ठेवीचा टप्पा पार केला आहे. बँकेकडे 106 कोटीच्या ठेवी असून बँकेने 76 कोटीची कर्जे वितरित केली आहेत. बँकेची गुंतवणूक 49 कोटी रुपयांची असून 128 कोटी रुपयांचे खेळते भांडवल आहे. बँकेने एकूण 182 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून ढोबळ नफा 1 कोटी 63 लाख 57000 आहे त्यातील आयकर वजा करता निवळ नफा 1 कोटी 21 लाख 57 हजार रुपये झाला आहे. बँकेच्या मुख्य शाखेसह शहापूर, मार्केट यार्ड व गोवावेस येथील शाखा ही उत्तम कार्य करीत असून बँकेच्या ठेवीत सुमारे 12 कोटीची वाढ झाली आहे. सुमारे नऊ कोटीची कर्जे ही जादा वितरित करण्यात आली आहेत. निव्वळ अनु उत्पादित प्रमाण म्हणजे एनपीए केवळ 0.35 टक्के इतका आहे गेल्या वर्षी हेच प्रमाण साडेतीन टक्के होते. बँकेचे सर्व संचालक व कर्मचारी वर्ग यांनी केलेल्या सहकार्यामुळेच बँकेने ही प्रगती गाठली आहे, असेही अष्टेकर यांनी सांगितले. यावर्षी प्रथमच अ वर्ग सभासदांना 20 टक्के इतका लाभांश देण्याची आमची योजना असून ब वर्ग सभासदांना 8 टक्के लाभांश दिला जाईल असे ते म्हणाले.
बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना लागू करण्यात आली असून येत्या वर्षभरात ग्राहकांना त्यांच्या खात्यामधून थेट आरटीजीएस व एनईएफटी करण्याची सुविधा, सर्व खातेदारांना एटीएम डेबिट कार्ड देण्याची सुविधा, क्यू आर कोड सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मायक्रो फायनान्स सुरू करण्याची योजना आमच्या डोळ्यासमोर असून त्यामुळे महिला सबलीकरणास मुदत होईल असाही विश्वास श्री अष्टेकर यांनी व्यक्त केला.
बँकेच्या संचालक मंडळात व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण- पाटील, संचालक अनंत लाड, शिवराज पाटील, रमेश शिंदे, गजानन पाटील, रवी दोड़णवर, सुवर्णा शहापूरकर, लक्ष्मी कानूरकर, सुहास तरळे, गजानन ठोकणेकर, विद्याधर कुरणे, मारूती सिग्गीहळली हे असून सीईओ म्हणून अनिता मूल्या काम पाहत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार

Spread the love  बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *