बेळगाव : कर्नाटक सरकारने बेळगाव परिसरातील सुपीक जमिनीतून ‘रिंग रोड’ करण्याचा जो घाट घातला आहे. शेतकर्यांच्या सुपीक जमिनी संपादनाद्वारे रिंग रोडच्या माध्यमातून शेतकर्यांना देशोधडीला लावण्याचे कृत्य सरकार करत आहे.
यासाठी येळ्ळूरची जनतेतर्फे सरकारच्या या कृत्याला प्रखर विरोध करण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत एकमताने व्यक्त करण्यात आला.
श्री चांगळेश्वरी मंदिर येथे ‘रिंग रोड’ला विरोध करण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शांताराम कुगजी हे होते. प्रारंभी प्रास्ताविकात सचिव प्रकाश अष्टेकर यांनी ‘रिंग रोड’बाबत सविस्तर माहिती विशद केली. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस विलास घाडी यांनी भूसंपादित शेतकर्यांनी वैयक्तिकपणे तक्रार करून म. ए. समितीने उभारलेल्या लढ्याला पाठिंबा देऊन आपल्या जमिनी अबाधित ठेवाव्यात, असे आवाहन केले. ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांनी शेतकर्यांच्या रिंग रोड विरोधी लढ्याला योग्य ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन लढ्याला पाठिंबा दिला.
माजी ग्रा. पं. उपाध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी म्हणाले, रिंगरोडसाठी सुपीक जमिन घेऊन सरकार शेतकर्यांच्यावर उपासमारीची पाळी आणत आहे. हा सरकारचा डाव आम्ही हाणून पाडला पाहिजे.
आज विकासाच्या नावावर लाखो लोकाना नोकरीचे आमिश दाखवून मोठ मोठ्या इंडस्ट्रिज वसवून युपी, बिहारी, बंगाली, गुजराथी लोकांना बेळगांवमध्ये स्थाईक करण्याचा प्रयत्न आहे असे सांगून यासाठी आम्ही रिंगरोडच्या न्यायालयात विरोध दावा दाखल करणार आहोत, असे स्पष्ट केले.
बैठकीत दत्ता उघाडे, भुजंग पाटील, पत्रकार मनोहर घाडी, येळ्ळूर ग्रा. पं. उपाध्यक्षा सौ. लक्ष्मी भरत मासेकर, सौ. मनीषा मनोहर घाडी आदींनी शेतकर्यांच्या रिंग रोड विरोधी लढायला पाठबळ देण्याविषयी विचार व्यक्त केले. बैठकीस ग्रा. पं. सदस्य दयानंद उघाडे, शिवाजी नांदूरकर, परशराम परीट, राकेश परीट, जोतिबा चौगुले, कृष्णा शहापूरकर, सुरज पाटील, रमेश गणपती पाटील, परशराम बुद्धाजी बिजगरकर, भरत मासेकर, हणमंत पाटील, शिवाजी हणमंत पाटील, मधु शटवाजी पाटील, प्रकाश मालुचे, आनंद कृष्णा घाडी, प्रवीण प्रकाश सायनेकर, प्रमोद बिजगरकर, आनंद चांगाप्पा मजकुर यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी यांच्या आभारानंतर बैठकीची सांगता झाली.