बेळगाव : एक नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना करून केंद्र सरकारने मराठी बहुभाषिक असलेला बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आणि 865 खेडी हा भाग अन्यायाने कर्नाटकात डांबला गेला. त्याला विरोध करण्यासाठी हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून संपूर्ण सीमा भागात पाळला जातो. येत्या मंगळवार दिनांक एक नोव्हेंबर 2022 रोजी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ‘निषेध मोर्चा’ आणि ‘सायकल फेरी’त सीमा प्रश्नाचा केंद्र बिंदू असलेल्या ‘येळ्ळूर’मधून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. शांताराम कुगजी होते.
प्रारंभी चिटणीस श्री. प्रकाश अष्टेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून जुलमी कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करत आहे, म्हणून मराठी भाषिकांनी या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करावा, असे सांगितले. बेळगाव तालुका म. ए. युवा समितीचे उपाध्यक्ष श्री. दत्ता उघाडे यांनी येत्या 23 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नाची सुनावणी असल्यामुळे निषेध मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन केले.
या बैठकीत ग्रामपंचायत अध्यक्ष श्री. सतीश पाटील, शे. का. पक्षाचे जिल्हा चिटणीस विलास घाडी, भुजंग पाटील, मनोहर घाडी, उपाध्यक्षा सौ. लक्ष्मी भरत मासेकर आणि सौ. मनिषा मनोहर घाडी यांची भाषणे झाली.
सदर बैठकीला ग्रामपंचायत सदस्य श्री. दयानंद उघाडे, शिवाजी नांदूरकर, परशराम परीट, राकेश परीट, लक्ष्मण चौगुले, कृष्णा शहापूरकर, सुरज पाटील, रमेश पाटील, परशराम बिजगरकर, आनंद मजकुर, भारत मासेकर, शिवाजी हणमंत पाटील, मधु शटवाजी पाटील, प्रकाश मालुचे, आनंद कृष्णा घाडी, प्रवीण प्रकाश सायनेकर, प्रमोद बिजगरकर इत्यादी बहुसंख्य समिती कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्याध्यक्ष श्री. दुद्दापा बागेवाडी यांच्या आभारानंतर बैठकीची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta