बेळगाव : मराठा समाजाचा 3 बी प्रवर्गातून 2ए प्रवर्गात समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एक-दोन दिवसात याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी दिली.
सुवर्णसौधमधील अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज बुधवारी एका खासगी हॉटेलात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार श्रीमंत पाटील म्हणाले, सरकारने नेमलेल्या आयोगाच्या अहवालातही मराठा समाजाला 3 बी प्रवर्गातून 2 ए प्रवर्गात समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तो या समाजाचा अधिकारही आहे. त्यासाठी मराठा समाजाने काल आंदोलन करून दिले आहे. मराठा समाजाची मागणी पूर्ण होऊन मिळण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेऊन प्रयत्न, पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले. या मागणीसाठी मुख्यमंत्री बोम्मई यांना याआधीही अनेकवेळा भेटलो आहे. गोंधळ घालून प्रश्न सुटत नसतात, मागण्या मान्य होत नसतात. त्यामुळे शिस्तबद्धरीत्या चर्चा करून यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी आज चर्चेस बोलाविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांना भेटून मराठा समाजाची मागणी समजावून सांगू, मागणी पूर्ण करण्यास आधीच उशीर झाला आहे. आता आणखी उशीर न करता लवकर मागणी पूर्ण करण्याची विनंती करू असे ते म्हणाले. मुदतीत मागणी पूर्ण न झाल्यास पुढील भूमिका काय राहणार या प्रश्नावर, मराठा समाजाने 31 डिसेंबरच्या आत मागणी पूर्ण करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. पुढे काय होते ओहऊ, मराठा समाज नेते योग्य निर्णय घेतील असे आ. श्रीमंत पाटील म्हणाले.