झारखंड सम्मेद शिखरजीचे पवित्रता जपा : केंद्र, राज्य सरकारकडे मागणी
निपाणी (वार्ता) : जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या झारखंड येथील श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ करण्याच्या तयारीत झारखंड सरकार आहे. या निषेधार्थ बोरगाव येथे एका दिवशीय कडकडीत बंद पाळून दिगंबर जैन समाजाच्या वतीने बुधवारी (ता.२१) शहरातून रॅली काढण्यात आली. या तीर्थक्षेत्राचे पवित्र जपावे, याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनामार्फत केंद्र व राज्य सरकारला देण्यात आले.
सकाळी बोरगाव येथील आदीसागर जैन गुंफा येथून मोर्चाला काढण्यात आला. महावीर सर्कल, संगोळी रायान्ना सर्कल, कनकदास सर्कल, जुने बस स्थानक, गांधी चौक, चावडी चौक, लगारे गल्ली, अरिहंत बँक, पाटील गल्ली, जय शिवराय चौक मार्गे जाऊन नगरपंचायत कार्यालय मध्ये मुख्याधिकारी पी. ए. कल्याणशेट्टी यांना निवेदन देण्यात आले.
कर्नाटकात जैन असोसिएशनचे संचालक युवा नेते उत्तम पाटील यांनी, श्रीक्षेत्र सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ झाल्यास या ठिकाणी त्याचे पवित्रता राहणार नाही. पर्यटन स्थळामुळे हॉटेल, बार, रेस्टॉरंट, मद्य, मांस सेवन याबरोबरच इतर सर्व गोष्टींना वाव मिळणार आहे.जैन धर्मातील २४ तीर्थकारपैकी २० तीर्थंकार या ठिकाणी मोक्ष मिळवले आहेत. हजारो मुनींनी या ठिकाणी दीक्षा घेतली आहे, असे पवित्र स्थान असलेल्या या सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ होण्यास समाजाचा विरोध आहे. सरकारने याबाबत योग्य विचार करून पर्यटन म्हणून स्थळ जाहीर करू नये.
यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष, सहकाररत्न रावसाहेब पाटील, मीनाक्षी पाटील, विनयश्री पाटील, धनश्री पाटील, नगरसेवक अभय मगदुम, अभय करोले, शोभा हवले, अनुज हवले, संजय हवले, नगरसेवक शरद जंगटे, बाळासाहेब बसन्नावर, विद्याधर अम्मन्नवर, प्रकाश पाटील, शिवानंद राजमाने, भाऊसाहेब पाटील, नेमा बारवाडे, मनोजकुमार पाटील, बाबासाहेब पाटील, नैनेश पाटील, संतोष पाटील, राजू मगदूम, बी. टी. वाठारे, अशोक अमन्नवर यांच्यासह दिगंबर जैन समाजबांधव, श्रावण -श्राविका उपस्थित होत्या.