बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात विश्व हिंदी दिवसाच्या निमित्ताने अल्पावधी पाठ्यक्रमाच्या अंतर्गत अनुवाद विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या साठी हिंदी विभागातर्फे “अनुवाद का महत्व” या विषयावर संगोळी रायण्णा सरकारी पदवी महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. गिरजाशंकर माने यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदी विभागाध्यक्ष डॉ. डी. एम. मुल्ला यांनी प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख वक्ता या नात्याने बोलताना डॉ. गिरजाशंकर म्हणाले की, अनुवाद कलेमुळे आज अनेक भाषा जवळ आल्या आहेत. अनुवादामुळे आज अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशातील प्रांतिय भाषांचे साहित्य एक -दुसऱ्या भाषेत अनुवादित होत आहे, ज्यामुळे अनेक देशांची संस्कृती, रहन-सहन,आचार- विचार आणि जीवन पद्धती आदीची जाणीव सर्वांना होत आहे.
हिंदी विषयाबद्दल बोलताना डॉ. गिरजाशंकर माने म्हणाले की, हिंदी आज फक्त भारतीय भाषा नसून ती विश्वस्तरावर अभिमानाने आपले नेतृत्व गाजवित आहे. या भाषेला आम्ही भारतीयांनी मनापासून स्वीकार केला पाहिजे.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. एच. जे. मोळेराखी यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी प्रा. मनोहर पाटील, ज्योतिबा पिंगट, सुनील सुतार आणि विद्यार्थी उपस्थित होते.