बेळगाव : मूळचे येळ्ळूर व सध्या सदाशिवनगर येथील रहिवासी, ज्येष्ठ सीमा सत्याग्रही, गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिक, शेतकरी कामगार पक्षाचे बेळगावातील एक धुरीण, ज्योती महाविद्यालयातील हिंदीचे सेवानिवृत्त प्रा. सी. व्ही. पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षाचे होते.
वार्धक्यामुळे गेले काही दिवस ते आजारी होते त्यांच्यावर घरातच उपचार सुरू होते. काल रात्री त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी चंदा, मुलगा वास्तुशास्त्र अभियंता व बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह चंद्रशेखर पाटील, कन्या डॉ. प्रा. नीता पाटील, जावई अरुण जाधव, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे.
त्यांचा जन्म येळ्ळूर मधील एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला होता. गावातील प्राथमिक शाळेत सातवीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर कष्ट करीत अनेक उच्च पदव्या प्राप्त केल्या. प्रारंभी रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्य करीत असताना हिंदी हा विषय घेऊन एम. ए., बी. एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बेळगावमध्ये दाजीबा देसाईंनी ज्योती महाविद्यालयाला येण्याची हाक दिल्यानंतर रयत मधील नोकरी सोडून ते ज्योती महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजाची सेवा करीत येथूनच निवृत्त झाले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या व्यवस्थापकीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी अनेक वर्षे काम केले. सत्यशोधक चळवळ, साराबंदी चळवळ, सीमा आंदोलन व गोवा मुक्ती संग्रामात ते निष्ठेने सहभागी झाले होते.
येळ्ळूर येथील नामवंत महाराष्ट्र हायस्कूल, श्रमिक कॉ. ऑप. सोसायटीच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. येळ्ळूरमधील वाचनालयाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यात त्यांचा वाटा होता.
येळ्ळूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.