Tuesday , December 9 2025
Breaking News

मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली 28 फेब्रुवारीला “चलो मुंबई”

Spread the love

 

बेळगाव : सीमाप्रश्न निर्णायक वळणावर आलेला असताना निद्रिस्त महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली “चलो मुंबई” हाक देण्यात आली आहे. येत्या 28 फेब्रुवारी दरम्यान सीमाभागातील हजारो सीमावासीय मुंबई येथे धरणे आंदोलन करणार असून यावेळी सीमावासीयांचे आधारस्तंभ माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.
मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने “चलो कोल्हापूर”हाक दिली होती कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो सीमावासीयांनी आंदोलन करून आपले गार्हाणे महाराष्ट्र शासनाकडे मांडले होते. सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासन सकारात्मक दिसत नाही. न्यायालयाच्या तारखा लांबणीवर पडत आहेत. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नी लाखों रुपये खर्च करत आहे मात्र महाराष्ट्र सरकार मात्र न्यायालयीन प्रक्रियेत कमी पडताना दिसत आहे. या सर्व गोष्टींची जाणीव महाराष्ट्र शासनाला दाखवून देण्यासाठी म. ए. समिती हे आंदोलन करणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे आंदोलन छेडण्यात येणार असून या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपली नावे आपल्या विभागातील घटक समितीकडे 10 फेब्रुवारी पर्यंत आधारकार्ड सहित नोंदवायची आहेत. जे कार्यकर्ते स्वतःच्या वाहनातून आंदोलनात सहभागी होणार आहेत त्यांनी आपल्या वाहनांचा क्रमांक आणि नांवे नोंदवावीत. आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रवासखर्च स्वतःचा स्वतः करायचा आहे व राहण्याची सोय म. ए. समिती करणार आहे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीने केले आहे.
माध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले की, सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारकडून पाठबळ मिळवत सीमाभागातील मराठी माणूस महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढतो आहे. सीमावासीयांना महाराष्ट्र सरकारकडून सहकार्याची अपेक्षा आहे त्यामुळे सरकारचे लक्ष सीमाप्रश्नी वेधण्यासाठी म. ए. समिती नेहमीच प्रयत्नशील असणार आहे. निद्रिस्त महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी “चलो मुंबई”नारा समितीने दिला आहे. सीमावासीयांना महाराष्ट्र सरकारचा पाठिंबा नसला तरी सीमावासीय स्वबळावर हा लढा लढेल असा निर्धार त्यांनी केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची रूपरेषा लवकरात लवकर ठरवून उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात माजी नगरसेवक रणजित चव्हाण-पाटील यांनी सूचना केली. समितीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी सर्व मतदारसंघात जनजागृती करून मराठी जनतेतील संभ्रम दूर करून संघटना मजबूत करणे गरजेचे आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. महानगपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडणुकीत नगरसेविका वैशाली भातकांडे यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन देखील करण्यात आले.

यावेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण-पाटील, , विकास कलघटगी, यांच्यासह मध्यवर्तीचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *