बेळगाव : शहापूर, वडगाव, जूनेबेळगाव, येळ्ळूर, अनगोळ, धामणे या शिवारात तसेच या भागात असलेल्या रस्त्याच्या कडेला रात्री 8 ते 11 पर्यंत दारु, गांजा, सिगारेट, जुगार, वाढदिवस व पार्ट्या करणारे शेतात बसून आपले कार्यक्रम करत असतात. त्यात लोकांच्या नजरेस पडू नये म्हणून शेतातील गवत गंजीच्या आडोशाला बसून दारुच्या काचेच्या, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या तसेच मांसाहारी खाद्यपदार्थ आणून बिनधास्त ताव मारत असतात. या कार्यक्रमात एखादे भांडण झाल्यास किंवा काचेची एक बाटली वर उडवतात व दुसरा दुसऱ्या काचेच्या बाटलीने हवेत मारायला जाऊन दोन्ही बाटल्या आदळल्या कि त्या फुटतात व त्या काचा तिथेच. नंतर जुगार खेळात सिगारेट, गांजा, अफिम ओढत नशा चढल्यावर पेटता सिगारेट बोटात धरुन गंजीच्या दिशेने उडवतात किंवा गंजीजवळ टाकून गेल्यास गवत गंजी जळून खाक होते. अशा घटना अनेकवेळा घडलेत. शहापूर शिवारातील शहापूर तलावाशेजारील दोन भाताच्या, पाच वाळलेल्या गवताच्या गंज्या एकाच रात्री खाक झाल्या. तेंव्हा पाण्याच्या गाड्या मागवून आग विझवली, रितसर पोलिसात तक्रारही दिली पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक रुपयाही भरपाई मिळाली नाही. भोवताली जुगाराचे पत्ते पसरले होते तेही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचे व जळणाऱ्या गवत, भात गंजाचे फोटोही देत पंचनामाही झाला पण सर्व कचऱ्यात गेले. सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांच्या खंबीर पाठिशी. पण संकटकाळी त्यांच्या घोषणा फक्त घोषणाच रहातात. तेंव्हा संबंधीत लोकप्रतिनिधी, पोलिस खाते शेतकऱ्यांप्रती जागरुक होऊन वरील भागातील शिवारातील शेतकऱ्यांच्या गवत गंजा, रब्बी पिकांचे रक्षण होण्यासाठी त्या भागात येणारे मद्यपी, पार्ट्या, गांजा, जूगार, अफिम ओढणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सदरच्या भागात रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत पोलिस गस्त घालत जर तसे दिसल्यास त्यांना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवल्यास व तो वृत्तपत्रातून प्रसिद्ध केल्यास पुन्हा तसे प्रकार घडणार नाहीत असा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्व भागातील शेतकरी व महिलातर्फे प्रशासनाला विनंती करण्यात आली. या प्रकरणी वडगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात रयत संघटना व शेतकरी बंधूतर्फे लेखी तक्रार दिली आहे. पण त्याचा कांहीच उपयोग झाला नाही व मा. जिल्हा पोलिस प्रमुखांचा फोन इन कार्यक्रमात सदर तक्रार करण्यासाठी फोन लावण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला पण तो लागत नसल्याने कृपया त्यांनी हिच तक्रार समजून येथील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करावे.