
हालगा येथील माजी सैनिक संघटनेचे उद्घाटन
बेळगाव : देश संरक्षणाचे कार्य करून निवृत्त झालेल्या हालगा गावातील जवानांनी माजी सैनिक संघटना स्थापन करण्याव्दारे एक चांगली सुरुवात केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून चांगले सैनिक घडविण्याबरोबरच निवृत्त सैनिकांना सर्व प्रकारच्या सरकारी सोयी सुविधा पुरवण्याचे प्रयत्न करावेत. तसेच सामाजिक कार्यात भाग घेऊन समाजाचा विकास साधावा, असे विचार कर्नल के. श्रीनिवास यांनी व्यक्त केले.
हालगा (ता. जि. बेळगाव) गावातील श्री मरगाई मंदिर परिसरात अलीकडेच पार पडलेल्या माजी सैनिक संघटनेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक या नात्याने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निवृत्त सुभेदार मेजर परशराम हनमंताचे हे होते. अनिल शिंदे यांनी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर कर्नल के. श्रीनिवास, कर्नल एस. दर्शन, कर्नल एम. एन. रजनी, हालगा ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बिळगोजी आणि ग्राम विकास अधिकारी विजयलक्ष्मी तेग्गी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कर्नल एस. दर्शन व कर्नल एम. एन. रजनी यांच्या हस्ते माजी सैनिक संघटनेच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कर्नाल के. श्रीनिवास यांच्या हस्ते माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या वार्ताफलकाचे उद्घाटन झाले.
यावेळी माजी सैनिक संघटनेच्यावतीने या संघटनेचे अध्यक्ष परशराम हनमंताचे यांनी प्रमुख पाहुणे कर्नल श्रीनिवास, कर्नल दर्शन, कर्नल रजनी, सदानंद बिळगोजी, विजयलक्ष्मी यांचे शाल, पुष्पगुच्छ व टोपी देऊन स्वागत केले. त्यानंतर हालगा गावातील शहीद झालेल्या हुतात्मांच्या वीर पत्नींचा संघटनेतर्फे साडी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी विजयलक्ष्मी तेग्गी, कर्नल रजनी, कर्नल दर्शन, ग्रा. पं. अध्यक्ष सदानंद बिळगोजी व परशराम हनमंताचे यांनी आपले विचार व्यक्त केले.
हालगा माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी परशराम हनमंताचे, उपाध्यक्षपदी तानाजी संताजी, सेक्रेटरीपदी आनंद बेळगोजी, जॉईंट सेक्रेटरीपदी महेश तारिहाळकर, खजिनदारपदी परशराम येळ्ळूरकर, उपखजीनदारपदी राजेंद्र हुडेद व संचालकपदी भैरू बिळगोजी यांच्यासह अन्य सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमावेळी शारदा प्राथमिक व माध्यमिक शाळेचे विद्यार्थी, गावातील नागरिक, निवृती जवानांचे परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल शिंदे यानी तर आभार प्रदर्शन भैरु बिळगोजी यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta