बेळगाव : महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत नेहमीच आडमुठी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते. याचाच प्रत्यय आजही पाहायला मिळाला.
महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आज सोमवारी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला माध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी आयुक्त घाळी माध्यमांच्या प्रतिनिधींना सभागृहा बाहेर जाण्याचे सांगू लागले. आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उपस्थित पत्रकारही चक्रावले. यापूर्वी अशा बैठकांचे वृत्तांकन करण्यास कोणतेच निर्बंध घालण्यात आलेले नव्हते. मग आत्ताच का असा प्रकार घडत आहे. याबाबत पत्रकारांनी आयुक्तांना जाब विचारला. मात्र तरीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या आयुक्तांनी पत्रकारांना बाहेर जाण्याची री ओढणे कायम ठेवले.
दरम्यान याच वेळी शहराच्या दोन्ही आमदारांचे सभागृहात आगमन झाले आहे. पत्रकारांनी आयुक्तांना आमदारांना जाऊन विचारा पत्रकारांना बैठकीचे वृत्तांत करण्याचे येते की नाही असा सल्ला दिला. त्यानंतर आयुक्त घाळी आमदारांकडे गेले त्यांच्याशी चर्चा केली आणि आपल्या आसनावर जाऊन बसले. त्यानंतर रीतसर सुरू झालेल्या बैठकीत सभागृह सचिव भाग्यश्री हुग्गी यांनी महापौर, उपमहापौर, आमदारांसह पत्रकारांचेही स्वागत केले. मात्र आयुक्त घाळी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत केलेले आजचे वर्तन सर्वांच्याच चर्चेच्या आणि संतापाचा विषय बनला.
Belgaum Varta Belgaum Varta