Wednesday , December 10 2025
Breaking News

“नवे क्षितिज नवी पहाट’ फुलावी आयुष्यातील स्वप्नांची पहाट”……

Spread the love

 

आज दिनांक 25 मार्च 2023 आज 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून तुम्ही सेवानिवृत होत आहात. आपला जन्म 25 मार्च 1963 रोजी कंग्राळी खुर्द गावातील विश्वनाथ गोपाळराव जाधव आणि शेवंता विश्वनाथ जाधव यांच्या पोटी झाला. यांचे आपण प्रथम अपत्य, आपण आपले प्राथमिक शिक्षण सरकारी मराठी मुलामुलींची शाळा कंग्राळी खुर्द व माध्यमिक शिक्षण मराठा मंडळ हायस्कूल मधून पूर्ण केला. व महाविद्यालयीन शिक्षण दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे ज्योती महाविद्यालय व भाऊराव काकतकर येथून पूर्ण केले. शालेय वयापासूनच खेळात प्रावीण्य असल्याने आपण महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा उत्कृष्ट खेळाडू, कबड्डीपट्टू अशी ओळख निर्माण केली होती. सर्व शिक्षकांचा प्रिय विद्यार्थी असं तुमचं सोज्वळ आणि तितकंच कणखर आणि स्पष्ट वक्तेपण असणारे असं व्यक्तिमत्त्व, त्यानंतर B.Ed ही पदवी सरकारी क्रांतिवीर संगोळी रायान्ना या महाविद्यालयातून मिळविली. या नंतर तुम्ही तुमच्या शिक्षकी सेवेला सुरुवात केली ती 1987 साली ब्रम्हलींग हायस्कूल सुळगे येथून आणि त्यानंतर 5 जुन 1989 ला दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शाळेत आपली नियुक्ती करण्यात आली. बेळगाव पासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या अठरापगड जाती गुण्या गोविंदाने नांदत असलेल्या पण प्लेगच्या साथीने थैमान घातलेल्या गोजगे गावात वसलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल मधून खऱ्या अर्थाने आपल्या शिक्षकी पेशाला सुरुवात झाली. शाळेत रुजू झाल्याच्या पासून ते सेवानिवृत्तीपर्यंत आपण मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली. कर्मवीरांचे ब्रीदवाक्य कमवा आणि शिका या हे नेहमी ध्यानात ठेवून आपण कार्यरत आहात.

ज्यावेळी आपण या शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झालात त्यावेळी ही शाळा देसाईंच्या जुन्या वाड्यात चालू होती. देसाईंचा वाडा जुन्या असल्याने पावसामुळे काही दिवसांनी या वसाहतीची पडझड सुरू झाली. पण विद्यार्थ्यांची संख्या मात्र वाढत होती, त्यामुळे विद्यार्थ्यांना बसायला अडचण निर्माण होत होती. आणि अचानक एके दिवशी त्या देसाईंच्या वसाहतीची पडझड थोडी जास्तच झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही धडपड करून तुमच्या नेतृत्वाखाली नवीन शाळेच्या इमारतीचे बांधकाम संस्थेच्या मान्यवरांच्या संमतीने इ.स. 1995 ला सुरुवात झाली. आणि भव्य अशी इमारत देणगीदार, ग्रामस्थ, शिक्षण प्रेमी आणि शाळेचे हितचिंतक, विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहकार्यातून उभी झाली आणि हे सगळ करत असताना आपली बरीच धावपळ झाली. आपल्या शिक्षकी पेशाला सुरुवात तर झाली पण ती विनाअनुदानित शिक्षक म्हणूनच आणि या विनाअनुदानित छायेखाली जवळजवळ आपण 25 वर्षे कार्यरत राहिलात. पण आपण आपली जिद्द आणि चिकाटी न सोडता न डगमगता अनेक हिरे निर्माण करण्याचं कार्य आपण अविरत करत राहिलात. आणि आज तुमचे शेकडो विद्यार्थी अनेक क्षेत्रात चमकताना दिसतात. आपण विनाअनुदानित कार्यरत असताना सुद्धा शाळेसाठी असणारी तुमची धडपड ही अविरत होती. आणि सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडविण हा आपला मानस या सर्व कार्यात तुम्हाला तुमच्या अर्धांगिनीची अर्थातच आमच्या मातोश्रींची लाख मोलाची साथ लाभली हे नक्कीच कारण कोणतीच तक्रार नसताना त्या तुमच्या पाठिशी ठामपणे उभ्या राहील्या. विनाअनुदानित शिक्षक म्हणून कार्यरत असताना तुमचा प्रवास सायकल वरून सुरूवात झाला व काही काळ आपण बसने ये-जा करत होता.
आपण एक उत्कृष्ट मराठी शिक्षक म्हणून बेळगाव जिल्ह्यात ओळखला जाता. विनाअनुदानित शिक्षक असून देखील विद्यार्थ्याविषयी व शिक्षणा विषयी असलेली आवड आणि शिकविण्याची पध्दत यामुळेच आपण शिकवत असलेल्या मराठी विषयाचा निकाल 100% लावला आहात. विनाअनुदानित शिक्षक म्हणून 25 वर्षांच्या प्रदीर्घ वनवासानंतर दि. 21 फेब्रुवारी 2009 साली आपण अनुदानित शिक्षक झाला. पण आजवर आपण शाळेसाठी डोळ्यासमोर दूरदृष्टी ठेवून अनेक विद्यार्थी घडवत आहात हे सगळं करत असताना संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही उत्कृष्ट रित्या सांभाळीत आम्हा दोन्ही भावंडांना विद्या विभूषित केलं तुमच्या प्रेरणेमुळेच आम्ही सुद्धा आमच्या शिक्षणात यशस्वी होऊ शकलो, मला वाटतंय गोजगे गाव आणि जाधव सर हे एक समीकरण आहे. कारण विद्यार्थी घडवत असतानाच गावातील लोकांच्या शिक्षणाबद्दल जागृती करून शिक्षणाची आवड निर्माण केली तसेच गावामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सुद्धा बरेच कार्य केला. गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी खुप टंचाई होती. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना शाळा सुटल्यानंतर पाण्यासाठी धडपड करावी लागत असल्याने घरी अभ्यासाला पुरेसा वेळ मिळत नव्हता हे जाणून आपण गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बोअरवेल च्या माध्यमातून करून दिली. तसेच अनेक ठिकाणी मराठी व्याकरण मार्गदर्शक म्हणून व्याख्यानमालेत सहभागी झालात तसेच बेळगाव ग्रामीण मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून जवळजवळ 7 वर्षे तुम्ही काम पाहिलात तसेच दहावी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व टी ई टी च्या प्रश्नपत्रिका निवडक कर्ता म्हणून तुम्ही आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडला. तुम्ही एक उत्तम व्यक्तिमत्व तर हातच पण एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून 2022 सालाचा उत्कृष्ट जिल्हा शिक्षक म्हणून पुरस्कार शिक्षणखात्यांन तुम्हाला प्रदान केला. खरोखरच बाबा तुमच्या कार्यकर्तृत्वाला सलाम तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आजवर आम्ही घडत आलो आहोत. तुमच कार्य हे खुप मोठ आहे असं मी म्हणणार नाही कारण शिक्षक हा क्रियाशील व समाजशील व्यक्ती असतो तो जगाचा भवितव्य घडविण्यासाठी झटत असतो हे तुम्ही तुमच्या कार्यातून दाखवून दिला. आणि गोजगे येथे 1986 साली लावण्यात आलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल या रोपट्याचं, वटवृक्षात रूपांतर करण्याचं काम तुम्ही करून दाखविलात आजवर अनेक कष्ट खालात. *पण आता वेळ आहे तो विश्रांतीचा आणि स्वतःच्या व्यस्त जीवनातून विसावा घेऊन पुन्हा स्वतःचा नव्याने शोध घेण्याचा……

लिखित : वैदेही जाधव (कन्या)

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष; सुवर्णसौधला भाजपचा घेराव घालण्याचा प्रयत्न

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करत भाजप नेत्यांनी प्रचंड निदर्शने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *