



बेळगाव : हत्ती-घोडे, बैलगाड्यांसह ढोलताशांच्या गजरात रामनवमीनिमित्त बेळगावात आज श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या मिरवणुकीत हजारो रामभक्तानी जल्लोषात सहभाग घेतला.
मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला बेळगावात आज अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे शहरात श्रीराम, रामभक्त हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वगुरू बसवण्णा यांच्या मूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. हत्ती, घोडे आणि बैलगाड्यांच्या सहभागाने ढोल ताशांच्या गजरात काढलेल्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या मिरवणुकीत हजारो रामभक्तानी जल्लोषात सहभाग घेतला.

बेळगावातील आंबेडकर मार्गावरील आंबेडकर उद्यानात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, श्रीरामाचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक, रामलिंगखिंड गल्ली मार्गे टिळक चौकापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली.यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले की, प्रभू श्रीरामांच्या आदर्शाचा प्रसार करण्याच्या हेतूने दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगावात रामनवमीनिमित्त श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे आज भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. या मिरवणुकीत हजारो अबालवृद्ध सहभागी झाले आहेत. त्या सर्वानी प्रभू रामचंद्रांचा आदर्श समोर ठेवून जीवनात वाटचाल करावी असे आवाहन करून कोंडुसकर यांनी सर्वाना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना राष्ट्रीय धर्माचार्य भगवानगिरी महाराज म्हणाले, श्रीरामांप्रमाणे समाजातील वंचित समाजघटकांना न्याय मिळावा यासाठी रमाकांत कोंडुसकर यांनी आपले कार्य सुरु ठेवले आहे. मी प्रथमच या मिरवणुकीला उपस्थित राहिलो आहे. पण येथे जमलेली गर्दी विशेषतः तरुणांची संख्या पाहून मी भारावून गेलो आहे. त्यांचे आयोजन कुशल आहे. भविष्यात त्यांच्या वाटचालीसाठी मी त्यांना आशीर्वाद देतो असे त्यांनी सांगितले.
या मिरवणुकीत हत्तीवरील अंबारीत छत्रपती शिवरायांची मूर्ती विराजमान केली होती. त्याशिवाय विश्वगुरू बसवण्णा यांची मूर्तीही सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये ठेवली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी वाहनावरील प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रामभक्त मारुतीरायाचे मोठे कटआऊट आणि पुतळाही लक्ष्यवेधी ठरला. घोड्यावर मावळ्यांच्या वेशात बसलेल्या लहान मुले आणि युवकांनी मिरवणुकीला वेगळाच रंग चढला. लहान मुलांनी पारंपरिक वेशात लाठीमेळ्याची प्रात्यक्षिके सादर केली. डीजेच्या तालावर तरुणांनी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत जल्लोषी सहभाग घेतला.
मिरवणूक उद्घाटनावेळी म. ए. समिती नेते मालोजी अष्टेकर, आर. एम. चौगुले, रणजीत चव्हाण-पाटील, विकास कलघटगी, दत्ता जाधव, आर. आय. पाटील, महादेव पाटील, अमित देसाई, चंद्रकांत कोंडूसकर, भरत पाटील, किरण हुद्दार यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. त्यांनी मिरवणुकीला शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta