Wednesday , December 10 2025
Breaking News

दक्षिण मतदारसंघात स्वतःचे संघटन असलेला उमेदवार गरजेचा

Spread the love

 

बेळगाव : समितीचा बालेकिल्ला समजला जाणारा मतदारसंघ म्हणजे बेळगाव दक्षिण. मात्र नेत्यातील दुहीमुळे समितीला हा बालेकिल्ला गमवावा लागला आहे. राष्ट्रीय पक्षाच्या मुजोरशाहीला कंटाळलेले कार्यकर्ते आता पुन्हा समितीच्या मुख्य प्रवाहात येऊ पाहत आहेत. विविध संघटना समितीकडे वळत आहे. त्यामुळे समितीचा परीघ वाढत चालला आहे. समितीचे बाळ वाढले आहे. मराठी माणूस आता पेटून उठला आहे. दक्षिण मतदारसंघात भगवा फडकविण्यास सज्ज झाला आहे. त्या अनुषंगाने मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहे. पण सध्याचे भाजपाचे आमदार अभय पाटील यांची या मतदारसंघात चांगलीच पकड आहे. त्यांना टक्कर देणारा उमेदवारही तितकाच तगडा असला पाहिजे. स्वतःची अशी वेगळी व्होटबँक असणारा उमेदवाराच दक्षिणविजय खेचून आणू शकेल.
एकीकडे कर्नाटक सरकार समिती संपली अशी वल्गना करते तर दुसरीकडे समितीचे बाळ वाढते. दक्षिण मतदारसंघात समितीची ताकद वाढत असताना संघटना वाढविणे व युवकांना सामावून घेणे ही नेत्यांची जबाबदारी आहे. नेत्यांनी पुढाकार घेऊन राजकीय समीकरणे बदलली पाहिजे. समितीमध्ये सामावू पाहणाऱ्या संघटनांना सामावून घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले तर दक्षिण मतदार संघाचे समितीचा झेंडा नक्कीच फडकणार.
दक्षिण मतदार संघात दोन लाखाहून अधिक मतदार आहेत. दक्षिणेत विजय मिळविण्यासाठी 75 ते 80 हजार मते घेणारा उमेदवार विजय संपादन करू शकणार आहे. यापूर्वी दक्षिण मतदारसंघ हा समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. मात्र समितीमधील दुहीमुळे समिती उमेदवार 30 हजार मतांचा टप्पा देखील पार करू शकणार नाही. लोकसभा निवडणुकीत समितीला 1 लाख 7 हजार मते मिळाली. त्यात दक्षिण मतदारसंघात 45 हजार मतदान झाले होते. एकप्रकारे समितीची टक्केवारी वाढली होती.
सध्या भाजप आमदार अभय पाटील यांची दक्षिण मतदारसंघात चांगलीच पकड आहे. त्यांना शह देण्यासाठी स्वतःची वेगळी ताकद असणाऱ्या तगड्या उमेदवाराची आवश्यकता आहे. स्वतःची एक स्वतंत्र व्होटबँक आणि समितीची मते अशी बेरीज केली तरच या मतदारसंघात समितीचा झेंडा फडकेल. काही दिवसांपासून या भागात समितीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शहर व ग्रामीण भागात समितीबद्दल सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. श्रीरामसेना हिंदुस्थान सारखी मोठी संघटना समितीमध्ये सक्रिय झाली आहे. हिंदुत्ववादी संघटना म्हणून ओळखली जाणारी ही संघटना आपले एक वेगळे अस्तित्व टिकवून आहे. मराठी भाषा जतन करण्यासाठी व सीमालढा आणखी तीव्र करण्यासाठी श्रीरामसेनेचे बळ ताकद वाढविणारे ठरेल. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी गटातटाचे राजकारण न करता एकच उमेदवार देणे आवश्यक आहे.

About Belgaum Varta

Check Also

भोवी-वडर समाजाच्या विकासासाठी बेळगावात आज नेते मंडळींचे मार्गदर्शन

Spread the love  निपाणी (वार्ता) : भोवी-वडर समाज विकास निगममधून समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *