बेळगाव : कर्नाटक विधानसभेतून मराठा समाजाला डच्चू देण्यात आला आहे. राष्ट्रीय पक्षाची यादी पाहता मराठा समाजाला राष्ट्रीय पक्षाकडून दुय्यम वागणूक दिली जात आहे असे दिसून येते. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत राज्य पातळीवरील मराठा समाजाचे प्रतिनिधी कमकुवत ठरले असेच म्हणावे लागेल. राज्याच्या राजकारणात इतर समाजाने आपले स्थान अबाधित राखले आहे ते आपल्या समाजासाठी आग्रही असतात त्यामुळे इतर समाजाची मते ही निर्णायक ठरतात. कर्नाटकात एकूण लोकसंख्येच्या 15 टक्क्यांहून अधिक मराठा समाज आहे. 90 लाखाहून अधिक प्रमाणात असणारा मराठा समाज राजकीय लाभापासून वंचित राहताना दिसून येत आहे. राज्यात अनेक जातीनिहाय गट आहेत ते आपापल्यापरीने दबाव तंत्र वापरून आपल्या समाजाला मोठ्या प्रमाणात राजकीय स्थान प्राप्त करून देताना दिसत आहे. मात्र मराठा समाज हा कुठेतरी कमी पडताना दिसत आहे. याला राज्य पातळीवर मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व जबाबदार आहे की काही प्रमाणात विस्कळीत झालेला मराठा समाज? इतर समाजाची मते राज्याच्या राजकारणात निर्णायक ठरली जातात. बहुसंख्य मराठा समाज असून देखील त्यांनी आपले अस्तित्व मर्यादित ठेवले आहे. मराठा समाजाने ठराविक नेतृत्वासाठीच आपली मागणी ठेवल्यामुळे आपल्या मागण्या देखील सिमीत ठेवल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मराठा समाजाला दुर्लक्षितच राहावे लागले आहे. मराठा समाजाने दूरदृष्टी व मोठा दृष्टिकोन ठेवला असता तर 2023 च्या निवडणूकीत उमेदवाराच्या यादीत मराठा समाजाला निश्चितच चांगले स्थान मिळाले असते. आजपर्यंत कोणत्याच राष्ट्रीय पक्षाने मराठा समाजाची गणती राजकीय पटलावर केलेली दिसत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. जर राजकीय पटलावर मराठा समाजाचे स्थान बळकट करायचे असेल तर मराठा समाजाला सत्तास्थानी प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. राज्याच्या राजकारणात कोणत्याच राष्ट्रीय पक्षाकडून निश्चित स्थान मिळताना दिसत नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करता मराठा समाजाला आपले असे वेगळे स्थान निर्माण करण्याची गरज आहे. सध्या बेळगावच्या राजकारणाचा विचार करता उत्तर मतदारसंघातील अनिल बेनके यांची एक टर्म पूर्ण झाली होती मात्र यावेळी त्यांचे तिकीट कापण्यात आले तर कन्नड भाषिक उमेदवारास संधी देण्यात आली तर दुसरीकडे अभय पाटील यांनी तीन वेळा आमदारकी उपभोगली असून देखील पुन्हा त्यांनाच भाजपने संधी दिली आहे. तर मराठा समाजाचे खंबीर नेतृत्व म्हणून समोर आलेले किरण जाधव यांना देखील वगळण्यात आले. वास्तविक दक्षिण मतदारसंघात 80 हजार पेक्षा जास्त प्रमाणात मराठा समाजाचे मतदार आहेत. तरीदेखील मराठा समाजाला डावलून अन्य भाषिक उमेदवाराला राष्ट्रीय पक्षाने संधी दिली आहे. काँग्रेसचे रमेश गोरल यांच्यावर देखील केवळ मराठी भाषिक म्हणून काँग्रेसने डावलले आहे की काय असा प्रश्न मराठी भाषिक उपस्थित होत आहे. पुढील काळात मराठा समाजाला आपले स्थान अबाधित राखण्यासाठी फक्त मराठा समाज म्हणून नाही तर मराठी भाषिक म्हणून देखील एकसंघ झाले पाहिजे व या राष्ट्रीय पक्षांना मराठा समाज व मराठी भाषिकांची ताकद दाखवून दिली पाहिजे.
Belgaum Varta Belgaum Varta