



बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी ग्रामीण मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी आज दुपारी भव्य मिरवणुकीद्वारे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
ग्रामीण मतदारसंघातून मतदान प्रक्रियेद्वारे 131 सदस्यांच्या निवड कमिटीने आर. एम. चौगुले यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली होती. आज आर. एम. चौगुले यांनी भव्य मिरवणुकीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
ध. संभाजी चौकात धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन करून बेळगाव शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अग्रभागी भगवा ध्वज आणि झांज पथक, ढोल ताशा अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक चालली होती. ढोल ताशांच्या गजरामध्ये निघालेल्या या मिरवणुकीत भगवे फेटे, भगव्या टोप्या परिधान केलेले स्वाभिमानी मराठी समितीनिष्ठ कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. आजच्या या मिरवणुकीत महिलांचा सहभाग देखील लक्षणीय होता. यावेळी कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत आसमंत परिसर दणाणून सोडला. भगवे ध्वज फडकवत निघालेल्या या मिरवणुकीत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, आर. एम. चौगुले यांचा विजय असो आदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी मिरवणुकीचा मार्ग दणाणून टाकला होता. बेळगाव उत्तरचे उमेदवार अमर येळ्ळूरकर, दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर, माजी आमदार मनोहर किणेकर, ऍड. राजाभाऊ पाटील यांच्यासह ग्रामीण मतदार संघातील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत सदस्य सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta