बेळगाव : शिवसेना सीमाभाग बेळगाव यांच्यावतीने तालुका म. ए. समितीचे ग्रामीणचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना पाठिंबा दर्शविण्यात आला. तसेच समितीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत, असे आश्वासनही शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी दिले.
मंगळवारी सकाळी आर. एम. चौगुले यांच्या प्रचारकार्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दिला. यामुळे आर. एम. चौगुले यांच्या समर्थकांमध्ये नव्याने उत्साह निर्माण झाला आहे. शिवसेनेचा नेहमीच समितीला पाठिंबा असतो. त्यामुळे आताच्या निवडणुकांमध्येही आम्ही सर्व शिवसैनिक म. ए. समितीच्या एकीकरण उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कार्य करणार आहोत, असे सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले यांनी सांगितले. यावेळी शहर प्रमुख राजू तुडयेकर, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत, प्रदीप सुतार, महिपाल चिन्नापाचे, नागेश देसूरकर, शिवा केरवाडकर, रामचंद्र मोदगेकर, सुरेश राजुकर आदी उपस्थित होते.